रक्कम जास्त असल्याने लिलावाला थंडा प्रतिसाद
बेळगाव : रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास करून परिसरात गाळे उभारले आहेत. 12 गाळ्यांपैकी 6 गाळे व्यावसायिकांसाठी राखीव ठेवले आहेत. उर्वरित 6 गाळ्यांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र एका गाळ्यासाठी 15 हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आल्याने प्रतिसाद लाभला नाही. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱ्या बसस्थानकाचा कायापालट केला आहे. विविध व्यापारी गाळ्यांची उभारणी आणि परिवहन मंडळाच्या कार्यालयासाठी इमारत बांधली आहे. तसेच 10 बस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी काही गाळे व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर दिले होते. मात्र स्मार्ट बसस्थानकाच्या उभारणीसाठी गाळे हटविण्यात आले होते. त्यामुळे 12 पैकी 6 गाळे जुन्या भाडेकरुंसाठी राखीव ठेवले आहेत. उर्वरित 6 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने ई-लिलाव आयोजित केला होता. दोनवेळा ई-लिलाव आयोजित करूनही प्रतिसाद लाभला नाही. एका गाळ्यासाठी 15 हजार रुपये भाडे कॅन्टोन्मेंट बोर्डने निश्चित केले आहे. त्यामुळेच लिलाव प्रक्रियेत व्यावसायिकांनी भाग घेतला नाही. काही बसेस गोगटे सर्कलला वळसा घेऊन परस्पर निघून जातात. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय कसा करायचा आणि भाडे कसे द्यायचे, असा मुद्दा व्यावसायिकांनी उपस्थित केला. भाड्याची रक्कम जास्त असल्यानेच लिलावात सहभाग घेतला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कॅन्टोन्मेंट आता तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया राबविणार आहे. पण रक्कम कमी केल्यानंतरच प्रतिसाद लाभण्याची शक्यता आहे.









