योगगुरु बाबा रामदेवांच्या उपस्थितीत 19 फेब्रुवारी रोजी पणजीत भव्य सोहळा
पणजी : लोकमान्य मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे वार्षिक दिल्या जाणाऱ्या ‘लोकमान्य मातृभूमी पुरस्कार’ वितरणाचा कार्यक्रम यावर्षी गोव्यात होणार असून पणजी येथे 19 फेब्रुवारी रोजी येथील आझाद मैदानावर पतंजलीचे संस्थापक योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या उपस्थितीत पतंजली आयुर्वेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पणजी येथे सायंकाळी पाच वाजता होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाइक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
लोकमान्यतर्फे यापूर्वी हा पुरस्कार पद्मश्री बाबासाहेब पुरंदरे, पद्मश्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर, सारस्वत बँकेचे माजी चेअरमन तथा खासदार एकनाथ ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे. लोकमान्यचे चेअरमन किरण ठाकूर यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली. या पुरस्काराचे मूल्य तथा स्वरूप ऊपये दहा लाख तसेच शाल, श्रीफळ, मानपत्र आणि खास चषक तथा स्मृतिचिन्ह बहाल करण्यात येणार आहे. पणजीच्या आझाद मैदानावर भव्य अशा पद्धतीचा हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. हा कार्यक्रम तमाम कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना खुला आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका तथा निमंत्रण पत्रिका लोकमान्यच्या गोव्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत. कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.









