भारताची आज सलामीची लढत कझाखविरुद्ध, सिंधू, लक्ष्य सेन, प्रणॉयवर भारताची भिस्त
वृत्तसंस्था/ दुबई
पूर्ण फिट झालेली पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅडमिंटन संघ आज मंगळवारपासून सुरू होणाऱया बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिपमध्ये कझाखविरुद्धच्या पहिल्या लढतीत विजयासाठी प्रयत्न करेल.
दोनवेळची ऑलिम्पिक पदकविजेती व जागतिक सातवी मानांकित सिंधू स्ट्रेस प्रॅक्चर दुखापतीतून पूर्ण बरी झाली असून यामुळे तिला मागील वर्षी पाच महिने बॅडमिंटनपासून दूर रहावे लागले होते. आता नव्या मोसमाची सुरुवात विजयाने करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर तिला झालेल्या दुखापतीमुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घ्यावी लागली आणि उर्वरित मोसमही तिला हुकला होता. मलेशिया ओपन व मायदेशातील इंडिया ओपनमध्ये अडखळत सुरुवात केल्यानंतर ती आता यशासाठी उत्सुक झाली आहे. त्यामुळे ती येथे पूर्ण ताकदीनिशी यशासाठी प्रयत्न करेल. महिला एकेरीत तिच्यासह 32 वी मानांकित आकर्षी कश्यपही खेळेल. आकर्षीने गेल्या महिन्यात बांगलादेश इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे.
पुरुष एकेरीत जागतिक आठवा मानांकित एचएस प्रणॉय भारताचा प्रमुख आव्हानवीर असेल आणि त्याच्या साथीला जागतिक दहावा मानांकित लक्ष्य सेनही असेल. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी सात्विकसाईराजच्या गैरहजेरीत ध्रुव कपिलासमवेत खेळेल. हिप इंज्युरीमुळे सात्विकसाईराजने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कृष्णा प्रसाद गर्ग व विष्णुवर्धन गौड पी. ही पुरुष दुहेरीतील दुसरी भारतीय जोडी आहे.
सात्विकच्या गैरहजेरीत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी ही सर्वात दुबळी जोडी असेल. कारण धुव कपिलास चिराग शेट्टीसमवेत जुळवून घेत आशियातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध मुकाबला करणे खूपच कठीण जाऊ शकते. राष्ट्रकुल कांस्यविजेत्या ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद महिला दुहेरीत भारताच्या प्रमखु आव्हानवीर असतील. याशिवाय अश्विनी भट व शिखा गौतम ही दुसरी जोडीही त्यांच्यासह असेल. मिश्र दुहेरीत मात्र इशान भटनागर व तनिशा क्रॅस्टो ही एकमेव जोडी भारताचे प्रतिनिधित्व करेल.
मानांकनातील पहिल्या दहा खेळाडूंना थेट प्रवेश देण्यात आला आहे तर उर्वरित खेळाडूंना निवड चाचणीतून निवडण्यात आले आहे. भारताचा या स्पर्धेत ब गटात समावेश असून मलेशिया हा या गटातील भारताचा सर्वात अवघड प्रतिस्पर्धी असेल. बर्मिंगहॅममध्ये भारताला मलेशियाकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. संयुक्त अरब अमिरात हा या गटातील तिसरा संघ आहे. चार गटातील पहिले दोन क्रमांक पटकावणाऱया संघांना उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळेल. धक्कादायक निकाल वगळल्यास भारत व मलेशिया या गटातून आगेकूच करतील अशी अपेक्षा आहे. मात्र गटातील अव्वल संघ भारताची दुसरी लढत झाल्यानंतर निश्चित होईल. भारताची ही लढत मलेशियाविरुद्धच बुधवारी होणार आहे. गुरुवारी यूएईविरुद्ध भारताची शेवटची गटसाखळी लढत होणार आहे.
भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरी गाठेल, असा विश्वास लक्ष्य सेनने व्यक्त केला आहे. ‘आपला संघ मजबूत असून ग्रुप टप्प्यातील ड्रॉ देखील बरा आहे. त्यामुळे आगेकूच करण्यात कोणती अडचण येईल असे वाटत नाही. आपली उपांत्यपूर्व फेरी निश्चित आहे, असे मला वाटते. बाद फेरीत प्रत्येक लढतीनुसार ठरविता येईल,’ असे सेन म्हणाला.
2017 मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत भारताने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली तर 2019 मध्ये गटसाखळी फेरी पार करण्यात अपयश आले होते. 2021 मधील स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. तीन वर्षाच्या खंडानंतर होत असलेल्या या स्पर्धेत 17 देशांनी भाग घेतला असून 19 फेब्रुवारीला अंतिम लढत होईल. चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया हे या स्पर्धेतील अव्वल चार मानांकित संघ आहेत.









