आरसीबी’ने घेतले 3.40 कोटींना,दीप्ती शर्माला ‘यूपी वॉरियर्स’कडून 2.60 कोटी, हरमनप्रीत ‘मुंबई इंडियन्स’कडे
वृत्तसंस्था/ मुंबई
पहिल्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात कोण किती भाव खाऊन जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या या लिलावात फलंदाज स्मृती मानधना हिने सर्वाधिक किंमत मिळवित बाजी मारली आहे. भारतीय महिला संघाच्या या उपकर्णधाराला आपल्या संघात ओढण्यासाठी लागलेल्या चुरशीत ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळूर’ने ‘मुंबई इंडियन्स’वर मात करताना 3.40 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला ‘मुंबई इंडियन्स’ने मानधनापेक्षा जवळपास निम्म्या किंमतीत म्हणजे 1.80 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. हरमनप्रीत तिच्या संघातील सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू देखील ठरलेली नाही. तिथे इंग्लंडच्या नॅट स्किव्हर-ब्रंटला 3.20 कोटी रु. प्राप्त झाले आहेत. हरमनप्रीत ही मोठी बोली लागलेल्या पहिल्या सहा भारतीय खेळाडूंमध्ये देखील स्थान मिळवू शकलेली नसून देशातील दुसरी सर्वांत महागडी खेळाडू अष्टपैलू दीप्ती शर्मा ठरली आहे. तिला ‘यूपी वॉरियर्स’ने 2.60 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे.

शेफाली, जेमिमा दिल्ली कॅपिटल्स’कडे
फटकेबाजीसाठी प्रसिद्ध शेफाली वर्मा आणि रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेतील विजयात चमकलेली जेमिमा रॉड्रिग्स यांना ‘दिल्ली कॅपिटल्स’ने अनुक्रमे 2 कोटी आणि 2.20 कोटी रुपयांना निवडले आहे. अष्टपैलू पूजा वस्त्रकार आणि रिचा घोष यांना प्रत्येकी 1.90 कोटीच्या बोलीसह मुंबई इंडियन्स व ‘आरसीबी’ यांनी निवडले आहे. जेमिमा आणि रिचा यांच्यासाठी लागलेल्या बोलीत व त्यांच्या निवडीत रविवारी झालेल्या पाकिस्तानच्या सामन्याने मोठी भूमिका बजावली आहे. ‘दिल्ली कॅपिटल्सने सध्याच्या महिला क्रिकेटच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगलाही 1.10 कोटी रुपयांना घेतले आहे.
‘आरसीबी’चा धडाका
मात्र महत्त्वाच्या खेळाडूंना घेण्याचा धडाका ‘आरसीबी’ने लावला. त्यांनी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलीस पेरीला 1.70 कोटी रुपयांना, तर न्यूझीलंडची कर्णधार डिव्हाईन डर्ट हिला मात्र स्वस्तात म्हणजे 50 लाखांत मिळविले आहे. ‘आरसीबी’ने आपल्या निर्धारित 12 कोटी रुपयांपैकी 7.10 कोटी रुपये चार खेळाडूंवरच खर्च केले.
‘प्रत्येक जण मानधना आणि ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी यांना ओळखतो. असे दर्जेदार खेळाडू मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. मानधना, पेरी आणि सोफी डिव्हाईन (रु. 50 लाख) मिळणे हा आमच्यासाठी स्वप्नवत निकाल आहे’, असे ‘आरसीबी’चे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. स्मृतीला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे आणि ती भारतीय परिस्थितीशी परिचित आहे. त्यामुळे ती कर्णधार होण्याची शक्यता आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

गार्डनर, स्किव्हर परदेशी खेळाडूंत आघाडीवर
लिलावाच्या पहिल्या फेरीतील प्रमुख निवडींपैकी एक म्हणजे ऑस्ट्रेलियाची ऑफस्पिन टाकणारी अष्टपैलू खेळाडू ऍश्ले गार्डनर हिला गौतम अदानीच्या मालकीच्या ‘गुजरात जायंट्स’ने 3.20 कोटी रुपयांना घेतले आहे. गार्डनर आणि नॅट स्किव्हर या परदेशातील सर्वाधिक मानधन प्राप्त झालेल्या दोन खेळाडू आहेत. ‘गुजरात जायंट्स’ने प्रामुख्याने परदेशी खेळाडू घेतले असून भारताच्या हरलीन देओलला 40 लाख रुपयांना त्यांनी घेतले आहे. ‘यूपी वॉरियर्स’ने इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन हिला 1.80 कोटी रुपयांना घेतले आहे. मानधना (आरसीबी), हरमनप्रीत (मुंबई इंडियन्स), लॅनिंग (दिल्ली कॅपिटल्स), बेथ मुनी (गुजरात जायंट्स) आणि दीप्ती शर्मा (यूपी वॉरियर्स) या पाच संभाव्य कर्णधार आहेत.
खूप मोठा क्षण ः स्मृती मानधना
आपल्या संघासोबत लिलाव पाहणारी मानधना खूपच आनंदित झालेली आहे. ‘आम्ही पुरुष खेळाडूंचा लिलाव पाहतो. महिलांसाठी अशा प्रकारचा लिलाव होणे हा खूप मोठा क्षण आहे. आरसीबीचा वारसा मोठा आहे, त्यांनी मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आशा आहे की, आम्ही दोघे मिळून एक मोठी टीम तयार करू, असे मानधना म्हणाली. दीप्ती शर्मा म्हणाली, ‘आम्ही या संधीची वाट पाहत होतो आणि मी उत्तर प्रदेशचीच असल्यामुळे खूप छान वाटत आहे. मला ‘यूपी वॉरियर्स’साठी शक्य तितके योगदान द्यायचे आहे’.

शिखा पांडेची दिल्ली कॅपिटल्सकडून निवड
दिल्ली कॅपिटल्सने अष्टपैलू खेळाडूंवर नजर ठेवून भारताच्या राधा यादव, दक्षिण आफ्रिकेच्या मॅरिझन कॅप यांना निवडताना मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेलाही संघात घेतले आहे. अनुभवी शिखाची त्यांच्याकडून 60 लाख रुपयांना निवड करण्यात आली आहे. गोव्याची खेळाडू असलेल्या शिखाकडे अनुभव असून संघातील युवा गोलंदाजांचे नेतृत्व करण्याच्या बाबतीत ती महत्त्वाची ठरेल.









