वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱयावर असून उभय संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील होणाऱया तिसऱया कसोटीचे स्थान बदलण्यात आले आहे. 1 ते 5 मार्च दरम्यान तिसरा सामना धर्मशालामध्ये आयोजित केला होता पण आता तो इंदौरमध्ये खेळविण्याची घोषणा बीसीसीआयने सोमवारी केली.
या मालिकेतील नागपूरचा पहिला सामना यजमान भारताने मोठय़ा फरकाने जिंकून ऑस्ट्रेलियावर आघाडी मिळविली आहे. धर्मशालातील मैदान आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास योग्य नसल्याचे बीसीसीआयचे क्युरेटर तपोश चटर्जी यांनी आपल्या अहवालामध्ये दिल्यानंतर बीसीसीआयने या कसोटीचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. आता इंदौरमधील होळकर स्टेडियमवर ही तिसरी कसोटी खेळविली जाणार आहे.









