वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत प्रथम आयोजित केलेल्या दक्षिण आफ्रिका टी-20 क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद सनरायझर्स इस्टर्न केप संघाने आपल्या अष्टपैल्यू कामगिरीच्या जोरावर पटकाविले.
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने प्रेटारिया कॅपिटल्सचा 4 गडय़ांनी पराभव केला. या अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केप संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऍडॅम रॉसिंग्टनचे अर्धशतक तसेच व्हॅन डेर मर्वेचे 4 बळी ही महत्त्वाची वैशिष्टय़े ठरली.
या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना प्रेटोरिया कॅपिटल्स संघाचा डाव 19.3 षटकात 135 धावात आटोपला. त्यानंतर सनरायझर्स इस्टर्न केपने 16.2 षटकात 6 बाद 137 धावा जमवित स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.
प्रेटोरिया कॅपिटल्सच्या डावामध्ये लंकेच्या कुशल मेंडिसने 21, जेम्स निश्चामने 19 धावा जमविल्या. या संघामध्ये कुशल मेंडीस हा एकमेव फलंदाज 20 धावांचा टप्पा ओलांडू शकला. फिल सॉल्टने 8, रिले रॉसोने 19 धावा केल्या. सनरायझर्स इस्टर्न केप संघातील मर्वेने आपल्या 4 षटकात 31 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेत सामनावीराचा पुरस्कारही मिळविला. सिसांदा मेगाला, बार्टमन यांनी प्रत्येकी 2 तर जेनसेन, मार्प्रम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मार्प्रेमला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या स्पर्धेतील 12 सामन्यात 33.27 धावांच्या सरासरीने 366 धावा जमविताना 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकविले तसेच त्याने गोलंदाजीत 11 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सनरायझर्स इस्टर्न केपच्या डावात दुसऱया षटकातच त्यांचा सलामीचा फलंदाज बेहुमा 2 धावावर बाद झाला. प्रेटोरियाच्या बॉशने हा गडी बाद केला. त्यानंतर रॉसिंग्टन आणि हर्मन यांनी आक्रमक फलंदाजीवर भर दिला. 6 षटकाअखेर पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स संघाने 1 बाद 76 धावापर्यंत मजला मारली होती. रॉसिंग्टनने हर्मन समवेत दुसऱया गडय़ासाठी 67 धावांची भागिदारी केली. जॉर्डन हर्मनने 17 चेंडूत 22 धावा जमविल्या. 6.4 षटकाअखेर सनरायझर्सने 2 बाद 78 धावापर्यंत मजल मारली होती. कर्णधार मार्प्रेमने फटकेबाजीवर अधिक भर दिला. सनरायझर्सने 9.4 षटकात 100 धावांचा टप्पा ओलांडला. प्रेटोरिया कॅपिटल्सच्या नॉर्त्जेने रॉसिंग्टनला बाद केले. त्याने 30 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह 57 धावा झळकाविल्या. त्यानंतर मार्प्रेम इनग्रेमच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 19 चेंडूत 26 धावा जमविल्या. 12.3 षटकात सनरायझर्स संघाने 4 बाद 113 धावांपर्यंत मजल मारली होती. निश्चामने यानंतर सनरायझर्सचे दोन गडी लवकर बाद केले. त्याने कॉक्सला 7 धावावर तर स्टब्जला 5 धावावर बाद केले. 15.3 षटकात सनरायझर्सने 6 बाद 126 धावापर्यंत मजल मारली होती. त्यांना विजयासाठी आणखी 10 धावांची गरज होती. जेनसेनने विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 13 धावा झळकवल्या. प्रेटोरिया कॅपिटल्सतर्फे नॉर्त्जेने 2 तर निश्चाम, इनग्रेम, आदिल रशिद व बॉश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – प्रेटोरिया कॅपिटल्स 19.3 षटकात सर्व बाद 135 (कुशल मेंडीस 21, निश्चाम 19, मर्वे 4-31), सनरायझर्स इस्टर्न केप 16.2 षटकात 6 बाद 137 (रॉसिंग्टन 52, मार्प्रेम 26, जेनसेन नाबाद 13, नॉर्त्जे 2-21).









