सर्व नागरी उड्डाणे काही काळासाठी रद्द
लडाख / वृत्तसंस्था
लडाखमध्ये पाळत ठेवणारे (सर्व्हिलन्स) भारतीय ड्रोन सोमवारी दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेनंतर सर्व नागरी उड्डाणे काही वेळासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. सोमवारी सकाळी ही घटना घडल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. याबाबत अधिक तपास केला जात असला तरी घटनेबाबत कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. सदर ड्रोन उंचावरील भागात पाळत ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते. हे चंदीगडमधील ‘डीआरडीओ’च्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीने (टीबीआरएल) विकसित केले आहेत. त्याच्या तैनातीमुळे उच्च उंचीच्या भागात आणि डोंगराळ भागात भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे.
भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवाद लक्षात घेता, गेल्यावषी जुलैमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय लष्कराला उच्च उंचीच्या भागात आणि वास्तविक नियंत्रण रेषेजवळील डोंगराळ प्रदेशात अचूक निरीक्षण करण्यासाठी स्वदेशी विकसित ड्रोन सुपूर्द केले होते. सोमवारी दुर्घटनाग्रस्त झालेले सर्व्हिलन्स ड्रोन या ताफ्यातील असल्याचे मानले जात आहे. अपघातानंतर विमानतळ आणि विमानांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून लडाख विमानतळ प्राधिकरणाने सर्व नागरी उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला.









