एखाद्या शहरातील प्रदूषण सांगण्यास ठरवलेली संस्था सरकारी यंत्रणातीलच असते, त्या प्रमाणे सफर प्रकल्प सरकारी यंत्रणाच आहे. आता त्या प्रकल्पकडून वर्तवलेल्या प्रदूषण नोंदीला घेऊन दुसऱया विभागाने आक्षेप नोंदविणे गंभीर बाब आहे. प्रदूषण नोंदी करणाऱया सरकारी यंत्रणेतील संस्थाच्या भाष्यात दुमत दिसते. हे दुमतांचे प्रदूषण मिटविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
थंडीत प्रदूषण वाढतेच असे तज्ञांचे मत आहे. त्यासाठी काही वैज्ञानिक कारणे सांगितली जातात. मात्र गेल्या दोन महिनाभरापासून मुंबईतील हवा दर्जा निर्देशांक अतिशय वाईट शेऱयात सांगितला जात होता. आता त्यावर आक्षेप घेत हवा दर्जा मोजणी यंत्र उभारलेली ठिकाणं चुकीची असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणांवर यंत्र उभारताना निकष नियमांचा विचार केला गेला नव्हता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारीदेखील सफर संस्थेच्या हवा निर्देशांक बीकेसी आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा अतिशय वाईट शेऱयात असून अनुक्रमे 326 आणि 316 इतका नोंदविण्यात आला आहे. तर अंधेरी, चेंबुर वाईट शेऱयात मोडत आहेत. तर भांडूप, मालाड, माझगांव, बोरिवली आ†िण वरळी येथील हवा मध्यम शेऱयात मोडत असल्याची नोंद आहे. सफरचा हा अंदाज चुकीचा म्हणायचा का? दरम्यान तरुण भारतकडून 17 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘मुंबईचा झाला कोंडवाडा’ या लेखातून मुंबईत हवा शुद्धीकरण यंत्रणेची गरज असल्याचे सर्वात प्रथम मांडले होते. त्यावर आता मुंबईत हवा शुद्धीकरण यंत्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. मात्र ही शुद्धीकरण यंत्र कुठे उभारावी याची सरकारी यंत्रणेतील संबंधित विभागांनी ठिकाणे नक्की करणे महत्त्वाचे आहे. थंडीच्या कालावधीत मुंबईतील प्रदूषण टोकाला पोहचते. यातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी या यंत्रणेची उभारणी आवश्यक आहे. मात्र यंत्रणेनेही गांभीर्याने अभ्यास करून याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
कोरोना काळानंतर पहिल्याच थंडीत मुंबईला प्रदूषणाचा तडाखा बसला. तुलनेने गेल्या दोन वर्षात थंडीत प्रदूषण तितकेसे जाणवले नाही.
लॉकडाऊनमध्ये बहुतांश उद्योग, वाहने, तसेच विकास कामेदेखील बंद होती. यामुळे 2021 च्या हिवाळी मोसमात प्रदूषणाचा प्रभाव जाणवला नाही. थंडीच्या कालावधीत मुंबईत तब्बल 22 दिवस हवेचा दर्जा वाईट किंवा अतिशय वाईट दर्जात मोडणारा होता. 2021 या वर्षातील थंडीच्या मोसमात फक्त सहा दिवस हवेची गुणवत्ता वाईट शेऱयात मोडणारी होती. तर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पुढे चाळीस दिवसात फक्त 18 दिवस पीएम 2.5 प्रदूषकांचे प्रमाण नियंत्रणात होते. मात्र 2022 वर्षाच्या अखेरच्या दोन महिन्यात मुंबईतील हवा दर्जा निर्देशांक वाईट शेऱयात नोंदविण्यात येत होता. विश्लेषणात्मक सांगावयाचे झाल्यास 2022 या वर्षात 280 दिवस कमी जास्त प्रदूषणाचे होते. यात 40 दिवस शुद्ध हवेचे तर 136 दिवस समाधानकारक दर्जाचे होते. तर एकूण 37 दिवस वाईट हवा दर्जाचे त्यातही 3 दिवस अति वाईट दर्जाचे होते असल्याची नोंद सांगण्यात आली.
थंडीत हवेचा दर्जा वाईट नोंदविण्यात येत असल्याचे या पूर्वीच्या नोंदीदेखील सांगतात. मात्र यात वारंवारता अधिक असल्याने हे प्रकरण गंभीर घेणे आवश्यक आहे. यातसुद्धा मुंबईतील काही ठिकाणे उदा. बीकेसी, चेंबूर, मालाड, माझगाव आणि शहरातील कुलाबा या ठिकाणांवर प्रदूषकांमधील पीएम 2.5 याची नोंद 250 अधिक नोंदविण्यात येऊ लागली आहेत. यातून हवा अतिप्रदूषित दर्जात जाते. अशा ठिकाणांवरील हवा प्रदूषण करणाऱया कारणांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. हवा प्रदूषण करणाऱयात कचरा जाळणे, विकास कामे, तसेच प्रदूषणकारी उद्योग यांतून होणाऱया उत्सर्जनांच्या नोंदी होणे आवश्यक आहे. मुंबईत इंधन धावणारी वाहनेदेखील प्रदूषके उत्सर्जित करत असतात. यातून हवेचा दर्जा बिघडतो. शिवाय सध्या सुरु असलेली मोठय़ा प्रमाणातील विकासकामे धुळी कण हवेत निर्माण करत आहेत. दर्जा खालावणाऱया या कारणांकडे यंत्रणांचे नियंत्रण हवे. गोरेगाव किंवा पवई सारख्या हिरवाई असलेल्या भागातदेखील प्रदूषणांची नोंद होत आहे. अशा ठिकाणी हवेत धुलीकणांची संख्या मोठय़ा प्रमाणात आढळत आहे.
दरम्यान मुंबई शहरात हवा दर्जा मापन यंत्रणा मोठय़ा प्रमाणात उभारणे आवश्यक आहे. यातून त्या त्या विभागाला इशारे देण्यास सहज होऊ शकते. दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा वर्षापूर्वी पाच ठिकाणी वायू ही वातावरणातील धूलीकणांचे शोषण करून हवा शुद्ध करणारी यंत्रणा कार्यान्वित केली होती. तसेच कलानगर जंक्शन, सायन पूर्व द्रूतगती महामार्गावरील पूल, घाटकोपर श्रेयस सिनेमा, भांडूप एलबीएस मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक सिग्नल अशा ठिकाणी देखील वायू यंत्रणा सुरु केली. यामुळे वातावरणातील प्रदूषके खेचली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. दरम्यान दर तीन महिन्यांनी यंत्रात साचलेल्या प्रदूषणांची मोजणी केली जात असे. यात कार्बन मोनोक्साईड आणि धूलिकणांचेच अधिक प्रमाण असल्याचे आढळून आले होते. हवा शुद्धीकरण यंत्रांमुळे प्रदूषकांची मोजणी होत होती. यातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा वर्षांपूर्वी मुंबईतील 25 ठिकाणी वायू यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि आयआयटी काम करत होती. या रेंगाळलेल्या प्रस्तावाचे पुढे काय झाले याची माहिती मिळत नाही.
सद्यस्थितीत मुंबई शहराला हवा प्रदूषण नोंद करणारी त्याचवेळी हवा शुद्धीकरण करणारी यंत्रणा आवश्यक आहे. मुंबईतील हवेचा दर्जा नोंदीवर मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ तसेच सफर या तिन्ही संस्था काम करत आहेत. त्यामुळे हवा दर्जा सुधारणा तसेच नोंदीवर या तिन्ही संस्थांमध्ये एकवाक्यता हवी. हे तिन्ही सरकारी यंत्रणा असून अन्य खासगी यंत्रणा या नोंदी सांगण्यास पुढे आल्यास गफलत होऊ शकते. सरकारी यंत्रणांची आकडेवारीच प्रमाण असते असा सामान्य जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास अखेरपर्यंत जपणे आवश्यक आहे. त्यामुळेच सरकारी यंत्रणा संस्थांमधील दुमतांचे प्रदूषण दूर करुन मुंबईकरांना आरोग्यदायी तसेच दर्जात्मक हवा कशी मिळेल यावर प्रयत्न व्हावेत.
राम खांदारे









