509 विमानोड्डाणे रद्द ः 250 किमी वेगाने वाहत आहेत वारे
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडमध्ये गेब्रियल चक्रीवादळाकरता अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 509 विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोमवारी देशाच्या उत्तर भागात 250 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहिले आहेत. ऑकलंड शहरात वाऱयांचा वेग सध्या 110 किलोमीटर प्रतितास इतका होता. देशाच्या उत्तर भागातील सुमारे 46 हजार घरांमधील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.
चक्रीवादळामुळे न्यूझीलंडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मागील 24 तासांमध्sय ऑकलंडमध्ये 4 इंच पावसाची नोंद झाली असून तेथे समुद्राची पातळी वेगाने वाढत आहे. चक्रीवादळाच्या प्रारंभीच वीजवाहिन्या, रस्त्यांचे नुकसान झाले असून अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. पुढील 24 महत्त्वपूर्ण असून यात मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. लोकांना घरांबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे न्यूझीलंडच्या हवामान विभागाने सांगितले आहे.
पंतप्रधानांकडून दिलासा पॅकेजची घोषणा
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांनी या वादळाला धोकादायक ठरविले आहे. तसेच त्यांनी मदतनिधी जाहीर केला आहे. याचबरोबर किनारी भागात राहणाऱया लोकांना सुरक्षितस्थळी धाव घेण्याचे आवाहन केले आहे.
आणीबाणी लागू होण्याची शक्यता
पुढील 24 तासांमध्ये वेगवान वाऱयांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वाढता धोका पाहता सरकार आणीबाणी लागू करण्याचा विचार करत आहे. एखाद्या चक्रीवादळामुळे आणीबाणी लागू होण्याची न्यूझीलंडच्या इतिहासातील ही तिसरी वेळ ठरणार असल्याचे इमर्जन्सी मॅनेजमेंट मिनिस्टर कीरन मॅकअनल्टी यांनी म्हटले आहे.









