पंचायतीतर्फे 50 लाख खर्चून सुसज्ज मैदान
फोंडा : भोम येथील पंचायत मैदानाचा विस्तार व विविध खेळांसाठी हे मैदान सुसज्ज करण्यात येत असून स्थानिक आमदार तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते कामाला प्रारंभ करण्यात आला. भोम पंचायतीतर्फे अंदाजे रु. 50 लाख खर्चून मैदानाच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरपंच दामोदर नाईक, उपसरपंच शैला नाईक, तिवरे-वरगांवचे सरपंच जयेश नाईक तसेच इतर पंचसदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मैदानाच्या विस्ताराला प्राधान्य दिल्याबद्दल मंत्री गोविंद गावडे यांनी पंचायत मंडळाचे अभिनंदन केले. खेळाला आता चांगले दिवस आले असून त्यात भवितव्य घडविण्याच्या अनेक संधी आहेत. शिवाय आपले आरोग्य सुदृढ राखण्यासाठी खेळणे व चालणे महत्त्वाचे आहे. गावात चांगली मैदाने असल्यास खेळाकडे कल वाढेल. मैदानाच्या कामाचा नियोजित खर्च वाढल्यास व आवश्यक क्रीडा सुविधा पुरविण्यासाठी क्रीडा खात्यातर्फे सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सरकारकडून उपलब्ध झालेल्या सुवर्ण महोत्सवी निधीतून मिळालेली ऊ. 50 लाखांची रक्कम मैदानावर खर्च करण्यात येणार असल्याचे सरपंच दामोदर नाईक यांनी सांगितले.









