पंचांच्या परवानगीविना मलम लावल्याबद्दल कारवाई
वृत्तसंस्था/ नागपूर
ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या कसोटीतील विजयात भारताचा नायक राहिलेल्या रवींद्र जडेजाला शनिवारी मैदानावरील पंचांची परवानगी न घेता हाताच्या सुजलेल्या बोटावर मलम लावल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ही घटना घडली होती.
भारताने मोठ्या फरकाने जिंकलेल्या या सामन्यात 81 धावांत 7 बळी घेणारा आणि 70 धावांचे योगदान देणारा जडेजा त्यावेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडून काही तरी घेत असताना आणि डाव्या हाताच्या बोटावर चोळताना दिसला होता. या अष्टपैलू खेळाडूच्या कृतीवर ऑस्ट्रेलियन मीडियात चर्चा सुरू होऊन एका माजी खेळाडने तर ही कृती कुतूहल वाढविणारी असल्याचे म्हटले होते. परंतु आयसीसीने, सदर मलम पूर्णपणे वैद्यकीय हेतूने बोटाला लावले होते आणि त्यामुळे चेंडूची स्थिती बदलली नाही, असे स्पष्ट केले आहे.
मात्र जडेजाची कृती खेळाडू आणि संघ कर्मचाऱ्यांसाठीच्या ‘आयसीसी’च्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारी मानली गेली आहे. आचारसंहितेच्या स्तर-1 चे उल्लंघन केल्याबद्दल जडेजाच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, जडेजाच्या शिस्तीबाबतच्या नोंदीत एक डिमेरिट गुण जोडला गेला आहे. त्याचे मागील 24 महिन्यांच्या कालावधीतील हे पहिले उल्लंघन होते’, असे आयसीसीने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 46 व्या षटकात ही घटना घडली होती. दरम्यान जडेजाने आपली चूक कबूल करून सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दिलेला दंड स्वीकारला आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही.









