वृत्तसंस्था/ बेंगळूर
कर्णधार अर्पित वासवदाच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या 2023 च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात सौराष्ट्र संघाने अंतिम फेरीच्या समीप वाटचाल करताना पहिल्या डावात कर्नाटकावर 120 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे.
या सामन्यात कर्नाटकाने पहिल्या डावात 407 धावा जमवल्या होत्या. कर्नाटकाचा कर्णधार मयांक अगरवालने नाबाद द्विशतक झळकवले होते. त्यानंतर सौराष्ट्रने पहिल्या डावात 527 धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार वासवदाने 406 चेंडूत 202 धावा झळकवल्या. चिराग जेनीने 72 धावांचे योगदान दिले. सौराष्ट्रने पहिल्या डावात 527 धावा जमवल्या. कर्नाटकाच्या कवीरप्पाने 83 धावात 5 गडी बाद केले. शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर कर्नाटकाने आपल्या दुसऱया डावात 26.4 षटकात 4 बाद 123 धावा जमवल्या. कर्नाटकाने 3 धावांची आघाडी मिळवली आहे. अगरवालने 55 धावा जमवल्या असून निकीन जोस 54 धावांवर खेळत आहे. सौराष्ट्रच्या साकारियाने 24 धावात 2 गडी बाद केले. सौराष्ट्र संघाने 2019-20 रणजी हंगामात विजेतेपद मिळवताना बंगालचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. तत्पुर्वी सौराष्ट्रने तीनवेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. 2012-13 तसेच 2015-16 या कालावधीत सौराष्ट्रला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2018-19 च्या कालावधीत सौराष्ट्रला अंतिम सामन्यात विदर्भकडून हार पत्करावी लागली होती.
संक्षिप्त धावफलक ः कर्नाटक प. डाव सर्व बाद 407, सौराष्ट्र प. डाव 174.4 षटकात सर्व बाद 527 (वासवदा 202, जॅक्सन 160, जेनी 72, कविरप्पा 5-83), कर्नाटक दु. डाव 26.4 षटकात 4 बाद 123 (अगरवाल 55, जोस खेळत आहे 54, साकारिया 2-24).









