वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी व्हाईट हाऊसमध्ये युद्धाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केल्यास यशस्वी तोडगा निघू शकतो, असे किर्बी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या नॅशनल सिक्मयुरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मुद्दय़ांबाबत भाष्य केले. तसेच रशिया-युक्रेन युद्धासंबंधीही त्यांनी भाष्य केले. शांततेचा पुरस्कार करणारा भारत या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मत किर्बी यांनी मांडले. भारतीय पंतप्रधान मोदींना जे काही प्रयत्न करायचे आहेत, ते त्यांनी करावेत. अमेरिका कोणत्याही पुढाकाराचे स्वागत करेल, असेही ते पुढे म्हणाले. भारताने पुढाकार घेतल्यास युद्ध लवकर संपेल आणि दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच रशिया-युपेन संघर्षाच्या मुद्दय़ावर आम्ही भारतासह आमच्या सर्व मित्रराष्ट्रांच्या संपर्कात असल्याचेही ते पुढे म्हणाले.
शांघाय परिषदेतील चर्चेचाही दाखला
जॉन किर्बी यांनी पंतप्रधान मोदींच्या यापूर्वीच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. खरे तर, हे युद्धाचे युग नाही, असे मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या संभाषणात सांगितले होते. मोदींचे हे विधान अचूक असून त्यावेळी अमेरिकेने त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले होते. तसेच युरोपनेही ते सकारात्मक पद्धतीने स्वीकारले होते, याची आठवण किर्बी यांनी करून दिली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची 2022 मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे एससीओ बैठकीदरम्यान स्वतंत्र भेट झाली होती. ही बैठक 50 मिनिटे चालली. यावेळी मोदी यांनी आजचे युग युद्धाचे नाही. लोकशाही मुत्सद्देगिरी आणि संवादावर चालते, असा सल्ला पुतीन यांनी दिला होता. त्यावेळी हे विधान जागतिक नेत्यांनी स्वीकारत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्याचे कौतुक केले होते.
रशियावर डागली ‘तोफ’
जॉन किर्बी यांनी रशिया-युपेन युद्धासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना जबाबदार धरले. युपेनियन लोकांसोबत जे काही घडत आहे त्याला केवळ पुतीन जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. रशिया सातत्याने युक्रेनमधील ऊर्जा प्रकल्पांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागत आहे. या हल्ल्यामुळे वीज गायब होत असून लोक अस्वस्थ होत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
अमेरिकेचीही भूमिका विषद
किर्बी यांनी रशिया आणि युपेनमधील विनाशकारी युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रयत्नांबद्दलही सांगितले. बायडेन यांनी कित्येक वेळा रशियाला इशारा दिलेला आहे. हे युद्ध संपायला हवे, अशीच अमेरिकेची भूमिका आहे. परंतु रशियन अध्यक्ष हे युद्ध संपवायला तयार नाहीत. त्यामुळेच युपेनला युद्धभूमीवर यशस्वी होण्यासाठी आम्ही मदत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच
रशियाकडून आताही युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशियाने शुक्रवारी एका तासात युपेनवर 17 क्षेपणास्त्रे डागली आहेत. युपेनच्या झापोरिझिया भागात पहाटे 4 वाजता हा हल्ला करण्यात आला. या भागात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. एकाचवेळी इतक्मया मोठय़ा प्रमाणात क्षेपणास्त्रे डागण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा ‘द कीव इंडिपेंडंट’च्या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.









