पत्नीलाही घेतले ताब्यात ः राज्य पोलीस, अंतर्गत सुरक्षा विभाग, एनआयएची संयुक्तपणे कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी पहाटे एका संशयिताला अटक केली आहे. बेंगळूरच्या थणिसंद्र येथील मंजुनाथनगर येथे मूळच्या उत्तर प्रदेशमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. अरिफ ऊर्फ महम्मद अरिफ असे त्याचे नाव आहे. राज्य पोलीस, अंतर्गत सुरक्षा विभाग आणि एनआयएने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
अरिफ हा टेलिग्राम, डार्कवेबद्वारे अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या गुपशी कनेक्ट होता, अशी माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. तो बेंगळूरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत असून सध्या वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत होता. त्याने यापूर्वी दोनवेळा इराकमार्गे सिरियाला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोन्ही देशांकडून त्याला परवानगी मिळाली नव्हती. दरम्यान, त्याच्या कृत्यांविषयी माहिती मिळताच तपास पथकांनी शनिवारी पहाटे 4 वाजता छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मागील दोन वर्षापासून तो अल कायदा संघटनेशी सातत्याने संपर्कात होता. सिरियामार्गे इराकला जाण्याचे त्याचे प्रयत्न होते. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशीही त्याचे संबंध असल्याची माहिती आयएसडी पथकाला मिळाली होती. अरिफच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात आली होती. आयएसआयएस या संघटनेत सामील होण्यासाठी पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये इराकमार्गे सिरिया किंवा अफगाणिस्तानला जाण्याची तयारी त्याने चालविली होती. त्यासाठी त्याने विमानाचे तिकीटही बुक केले होते.
टेलिग्राम, डार्कवेबच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या अरिफचे बनावट ट्विटर अकाऊंट यापूर्वीच ट्विटर कंपनीने ब्लॉक केले होते. त्यानंतर तो ट्विटरवर सक्रिय नव्हता. दोन दिवसात बेंगळूरमधील भाडोत्री घर रिकामे करणार असल्याचे त्याने घर मालकाला सांगितले होते. पत्नी आणि दोन मुलांना उत्तरप्रदेशला पाठवून विदेशात पलायन करण्याची योजना त्याने तयार केली होती. दरम्यान, शनिवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून लॅपटॉप, दोन हार्डडिस्क जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी केली जात आहे.
एनआयएच्या कार्यालयात चार तास चौकशी
अरिफ पूर्वी पीजीमध्ये वास्तव्य करून कंपनीत काम करत होता. दीड वर्षांपूर्वी त्याने थणिसंद्र येथील मंजुनाथनगरमध्ये भाडोत्री घर घेतले होते. नंतर पत्नी आणि मुलांना बेंगळूरला बोलावून घेतले होते. शनिवारी अरिफची पत्नी सफा हिची एनआयएच्या पथकाने चौकशी सुरू केली आहे. मात्र, तिच्याकडून अधिक माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेऊन एनआयएच्या कार्यालयात नेऊन चौकशी केली जात आहे. त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. तसेच अरिफच्या बँक खात्याची माहिती जमा करण्यात आली असून अकाऊंट गोठविण्यात आले आहे. त्याच्या बँक खात्यावर विदेशातून दहशतवादी संघटनांकडून पैसा जमा झाले आहेत का, याची माहिती मिळविण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वी फूड डिलिव्हरी करणाऱया संशयित दहशतवाद्याला बेंगळूरमध्ये अटक करण्यात आली होती. चौकशीवेळी त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अरिफच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. त्यांच्या कृत्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर शनिवारी त्याला अटक करण्यात आली आहे.









