लपविलेले अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे, बाँब, स्फोटके आदींचा शोध घेण्यासाठी पोलीस किंवा सैनिक यांच्याकडून ‘शोधक श्वानां’चा उपयोग केला जातो. ज्या शस्त्राने हत्या केली गेली आहे, त्या शस्त्रांचा शोधही हे प्रशिक्षित श्वान अचूकपणे घेतात. तपासकार्यात त्यांचे योगदान खरोखरच अतिशय मोठे असते.
पण आता श्वानांच्या याकामी एक मोठा स्पर्धक निर्माण होत आहे. तो स्पर्धक आहे, आपण झाडांवर, इमारतींच्या छतांवर किंवा उंच ठिकाणी स्वच्छंदीपणे संचार करणारी खार. चीन या देशातील पोलिसांनी या कामासाठी खारींना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे इतर देशांमध्येही तो केला जाण्याची दाट शक्यता आहे. श्वानांपेक्षा खारी याकामी अधिक उपयुक्त आहेत, असा चीनी पोलिसांचा अनुभव आहे. खारींना प्रशिक्षण देण्यास कमी वेळ लागतो. तसेच श्वान जेथे जाऊ शकत नाहीत, असा सांद्रीकोपऱयात खार लीलया पोहचते, कारण ती खूपच छोटी आणि श्वानापेक्षाही चपळ असते.
चीनने हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अशा शोधक खारींचे एक दलच निर्माण केल्याचे समजते. अर्थात, यासाठी विशिष्ट प्रजातींच्या खारी उपयोगात आणल्या जातात. चीनच्या हेचुआन प्रांताच्या पोलिस प्रमुखांनीं खारींच्या अशा सहा प्रजाती शोधून काढल्या आहेत, ज्या शोधकार्यात प्रवीण आहेत. या खारींना प्रशिक्षण देण्याचे कार्य पोलीस अधिकारी यिन जिन यांनी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आतापर्यंत 6 खारींना प्रशिक्षित केले आहे. श्वानाच्या हालचाली त्वरित लक्षात येतात. त्यामुळे संशयित सावध होण्याची शक्यता असते. मात्र, खारींच्या हालचाली एकदम दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे त्या अधिक सहजगत्या आणि कोणाच्याही लक्षात न येता त्यांचे शोधकार्य करु शकतात. ज्या वस्तूचा शोध घेतला जात आहे, ती आढळल्यास विशिष्ट प्रकारे तो संदेश शोधकर्त्यांपयंत पोहचविण्याचीही या खारींची क्षमता असते. त्यामुळे कदाचित भविष्यात श्वानांचे हे स्थान खारीने पटकाविले आहे, असे आपल्या सर्वांना दिसून येऊ शकते.









