अनेक मान्यवरांनी वाहिली पुष्पांजली
प्रतिनिधी /पणजी
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कोकणी साहित्यिक, लेखक, कवी नागेश करमली यांच्या पार्थिवावर पणजीतील सांतइनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव चिंबल येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे मान्यवरांनी येथून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतरांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्पांजली वाहिली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी हजर होते. करमली यांच्या निधनामुळे एक प्रखर राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी, स्वातंत्र्यसैनिक हरपला अशी भावना अनेकांनी वर्तवली. कोकणी साहित्यिक वर्तुळात व कोकणी चळवळीत ते सक्रिय होते. गोवा मुक्ती लढ्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता आणि गोव्यातील विविध आंदोलनात ते नेहमी पुढे असायचे आणि आवाज उठवायचे. कोकणी भाषा मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. कोकणी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी खूप काम केले. साहित्याच्या माध्यमातून कोकणीची सेवा केली, अशी माहिती अंत्यसंस्कारासाठी आलेल्या अनेक मान्यवरांनी दिली.
अनेक नागरिक, स्वातंत्र्यसैनिक अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. त्यांनी करमली यांना अखेरचा निरोप दिला. तत्पूर्वी पोलीस दलातर्फे त्यांनी निवासस्थानी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
कोकणी चळवळीतले खंदे साहित्यिक : नायक
कोंकणी चळवळीतले खंदे साहित्यिक, सतत कोंकणीच्या विकासाचा ध्यास मनात बाळगून कार्यरत राहणारे, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी नागेश करमली यांना देवाज्ञा झाली हे ऐकून धक्काच बसला. नागेश करमली यांनी तरूणपणी गोवा मुक्ती संग्रामात उडी घेऊन गोवा स्वतंत्र होईपर्यंत कार्यरत राहिले. कोंकणी चळवळीचे नेतृत्व करताना अनेक लेखक, कवींना घडवले. आकाशवाणीच्या सरकारी सेवेत असून सुद्धा कोंकणीसाठी होणाऱ्या सर्व आंदोलनात अग्रणी राहिले. त्यांच्या निधनामुळे कोंकणीची आणि गोमंतकाची हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दांत कोकणी भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि साहित्यिक भिकू बोमी नायक यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.









