तिरुपती प्रवाशांची झाली सोय, तरुण भारतच्या वृत्ताची दखल : खासगी वाहने-रिक्षाचालकांकडून होणारी लूट थांबल्याने समाधान
बेळगाव : तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावत असल्याने सांगली, मिरज, कोल्हापूरच्या प्रवाशांना बेळगावमध्ये उतरावे लागत आहे. याचा फायदा खासगी वाहनचालक उचलत असल्याने येथून थेट बससेवा सुरू करावी, अशा आशयाचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत तिरुपती प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव रेल्वेस्थानक ते कोल्हापूर, पुणे मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. तरुण भारतने आवाज उठविल्याने प्रवाशांची लूट थांबली असून समाधान व्यक्त होत आहे.
सुलधाळ ते गोकाकपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावत आहे. बेळगाव रेल्वेस्थानकात आल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकात जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत होता. परंतु या संधीचा फायदा उठवत काही रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडी आकारली. तसेच काहींनी तर हद्द करत थेट रेल्वेस्टेशन समोरील बसस्थानकात खासगी वाहने आणून उभी केली. ही वाहने थेट कोल्हापूरला सोडण्यात आली होती. खासगी वाहनचालक थेट सेवा पुरवितात, मग परिवहन मंडळ निद्रिस्त का? असा प्रश्न प्रवासी विचारत होते. तरुण भारतने मंगळवार दि. 7 रोजी हे वृत्त प्रसिद्ध करताच परिवहन मंडळाला जाग आली. गुरुवारपासून रेल्वेस्थानकातून कोल्हापूर व पुणे थेट 4 ते 5 गाड्या सोडण्यात आल्या. सर्व वाहने फुल्ल होऊन कोल्हापूरला जात असल्याने परिवहन मंडळालाही महसूल मिळू लागला आहे.
नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल
तिरुपती एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावणार हे माहिती असतानाही त्याचे नियोजन करण्यामध्ये रेल्वे अधिकारी कमी पडले. रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करताच सांगली, कोल्हापूर, मिरज येथील प्रवाशांसाठी थेट बससेवेसाठी परिवहन मंडळाशी संपर्क साधणे आवश्यक होते. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यापुढे तरी अशावेळी बसची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.









