सरस्वती वाचनालयाच्या संगीत कला मंचतर्फे आयोजन
बेळगाव : कोरे गल्ली, शहापूर येथे सरस्वती वाचनालयाच्या संगीत कला मंचतर्फे दि. 11 व 12 फेब्रुवारी रोजी पंडित कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दि. 11 रोजी सायंकाळी 5.30 वाजता अंगद देसाई बेळगाव यांचे तबला वादन व मंदार गाडगीळ-पुणे यांचे गायन होणार आहे. रविवार दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता वैष्णवी हानगल व गीतिका उमदेकर यांचे गायन होणार आहे. संध्याकाळी 5.30 वाजता वाचनालयातर्फे डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांना बेळगाव भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर रविंद्र जकाती व राजाराम अंबरेडकर यांचे गायन होणार आहे. वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. परिचय पुढीलप्रमाणे….
डॉ. सिद्धराम महास्वामी

यांचा जन्म बागलकोट जिल्ह्यातील हलगळी गावी झाला. स्वामी हिंदी व तत्त्वज्ञान विषयाचे एमए पदवीधर आहेत. भक्तिदर्शन, धर्मामृत, धर्मज्योती, तौलनिक धर्मदर्शन, कृतयोगी विनोबा यासह 12 हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. बेळगावच्या मारुती गल्लीतील नागनूर रुद्राक्षीमठाचे ते नववे मठाधीश आहेत. तेथे विद्यार्थी प्रसाद निलय चालवून विद्यार्थ्यांच्या भोजनाची आणि शिक्षणाची सोय त्यांनी केली आहे. 1991 मध्ये लिंगायत अध्ययन
अॅकॅडमी, 1995 मध्ये लिंगायत संशोधन केंद्र ग्रंथालय, 2006 मध्ये लिंगायत दर्शन मासिक, 2007 मध्ये विद्यार्थी प्रसाद निलयचा अमृत महोत्सव त्यांनी केला. 2012 मध्ये ते कृषी क्षेत्राकडे वळले. लिंगायत स्वतंत्र धर्माच्या आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. धारवाड येथे मार्गदर्शक केंद्र चालविले आहे. शिवाय देवराज अर्स कॉलनीमध्ये वृद्धाश्रमही सुरू केला असून एस. जी. बाळेकुंद्रीचे कामकाजही पाहतात. सध्या गदग येथील डंबळ मठाचे मठाधीश आहेत.
वैष्णवी हानगल, हुबळी

पद्मविभूषण गंगुबाई हानगल यांची नात म्हणजे वैष्णवी. त्यांना आजीच त्यांच्या पहिल्या संगीतगुऊ, संगीतामध्ये कर्नाटक विद्यापीठातून पदवी व शिवाजी विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली. परंपरागतपणे आलेले किराण घराणा संगीतच त्यांनी आत्मसात केले. त्यांनी शास्त्रीय व अर्धशास्त्रीय दोन्ही प्रकारामध्ये प्राविण्य मिळविले. त्यांचे कार्यक्रम आकाशवाणीमध्ये प्रसारित होतात. त्यांना ‘कृपा पुट्टराज भूषण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. गंगुबाई हानगल संगीत विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केले.
रविंद्र जकाती, हुबळी

त्यांनी संगीतामध्ये एम. ए. पदवी मिळविली असून प्रथम क्रमांक पटकावला आहे. पं. बाबुराव इनामदार, मल्लिकार्जुन मन्सूर व पं. कुमार गंधर्व यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी गदग येथील पं. पंचाक्षरी कॉलेजमध्ये प्राचार्य व ख्यात विभागाचे मुख्यस्थ म्हणून कार्य केले आहे. त्यांनी पं. गंगुबाई हानगलचा ‘गानगंगा’ पुरस्कार, गदग जिल्हा राज्योत्सव पुरस्कार व टी. पी. अक्का सुवर्ण पदक मिळविले आहे.
गीतिका उमदेकर, पुणे

संगीत घराण्यामध्ये जन्म झाल्यामुळे वडील पं. श्रीराम उमदेकर, आजोबा पं. बाळाभाऊ उमदेकर यांच्याकडून संगीत शिक्षण मिळविले आहे. वडील प्रसिद्ध सितार वादक आहेत. आकाशवाणीमध्ये त्या बी-हाय ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळविल्या आहेत. ‘संगीत भूषण व संगीत रत्न संगीताचार्य’ या पदव्या मिळविल्या आहेत. त्यांनी कोविद व संगीतामध्ये एम. ए. परीक्षामध्ये दोन दोन सुवर्ण पदके मिळविली आहेत. शिवाय त्यांनी अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. नाद साधक, युवा उत्सव, सूर सिंगर संसद समारोह इत्यादी कार्यक्रमामध्ये त्यांना पुरस्कार प्राप्त आहेत.
पं. राजाराम अंबरेडकर, मुंबई

यांचा जन्म वेंगुर्ला येथे 1954 मध्ये झाला असून, भारतीय शास्त्रीय पिता दत्ताराम (भाऊ) यांच्याकडून 12 वर्षे तबल्याचे शिक्षण घेतले. नंतर पं. मुरली मनोहर शुक्ला, उस्ताद गुलाम मुस्तफाखान व पं. भीमसेन जोशी यांच्याकडून पुढील शिक्षण घेतले. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती घेऊन पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी अभंग, नाट्या संगीत व भावगीते महाराष्ट्रात व बाहेरही गायिली आहेत.
सगीत संमेलन सर्वांसाठी खुले असून रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









