मेकॅनिक पदासाठी निवडलेले नाव एक तास आधीच जाहीर : चौकशी करण्याची मागणी
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्याचा सपाटा चालविला आहे. मात्र या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात आला होता. याबाबत सरकार नियुक्त सदस्यांनीही संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार नोंदविली असून, कॅन्टोन्मेंटमध्ये चाललेल्या कामगार भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने विविध पदांवर 35 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र याकरिता लाखो रुपये घेतल्याचा आरोप होत आहे. कर्मचारी भरती प्रक्रियेत फिक्सिंग होत असल्याची तक्रारदेखील यापूर्वी करण्यात आली होती. तरीही याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. या भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे कॅन्टोन्मेंटची नागरी वसाहत महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर दुसरीकरडे कॅन्टोन्मेंटमधील रिक्त पदे भरण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र ही पदे भरताना 10 ते 15 लाख रुपये घेण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत तक्रारदेखील करण्यात आली होती.
यापाठोपाठ आता आणखी एक पुरावा चव्हाट्यावर आला असून, कर्मचारी भरती पूर्ण होण्यापूर्वीच कोणत्या अर्जदाराचे नाव जाहीर होणार आहे, हे काहींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे. तसेच भरती प्रक्रियेत फिक्सिंग करून अर्जदाराची निवड करण्यात आल्याचा आरोप ट्विटरवर केला आहे. दि. 4 फेब्रुवारी रोजी महापालिकेत मेकॅनिक पदासाठी भरती प्रक्रिया झाली. यावेळी अर्जदारांनी अर्ज केले होते. पण निवड होण्यापूर्वीच सकाळी 11.38 वा. ट्विटरद्वारे निवड होणाऱ्या अर्जदाराचे नाव जाहीर करण्यात आले होते. तसेच याबाबत तक्रार देखील करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी 12.30 वा. निवड प्रक्रियेचा निकाल जाहीर झाला. ट्विटरद्वारे जाहीर केलेल्या उमेदवाराचीच निवड कॅन्टोन्मेंटने केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे निवड प्रक्रियेत फिक्सिंग होत असून, चाचणी आणि निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच अर्जदाराचे नाव निश्चित होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र सरकार नियुक्त सदस्यांनी संरक्षण मंत्रालयाला पाठविले आहे.









