वृत्तसंस्था/ रियाध
येथे सुरू असलेल्या सौदी प्रो लीग फुटबॉल स्पर्धेतील गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अल नासेर क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱया पोर्तुगालच्या क्रिस्टीयानो रोनाल्डेने अल वेहिदा क्लबविरुद्ध 4 गोल नोंदविले. रोनाल्डोच्या अल नासेर क्लबने हा सामना 4-0 असा एकतर्फी जिंकला. क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डोने 500 गोलांचा टप्पा ओलांडला आहे.
क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत खेळताना रोनाल्डोने यापूर्वी मँचेस्टर युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करताना 103 गोल, रिअल माद्रिद संघाकडून खेळताना 311 गोल, ज्युवेंट्स क्लबकडून खेळताना 81 गोल, स्पोर्टींग लिस्बन क्लबकडून खेळताना 3 गोल तर अल नासेर फुटबॉल क्लबकडून खेळताना 5 गोल केले आहेत. ख्रिस्टीयानो रोनाल्डोने आतापर्यंत पाच वेळा बलून डीओर पुरस्कार मिळविला आहे. सौदी अरेबियातील अल नासेर या क्लबबरोबर गेल्या डिसेंबर महिन्यात रोनाल्डोचा करार झाला होता. हा करार अडीच वर्षांचा आहे.









