वृत्तसंस्था/ लखनौ
4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत खेळविल्या जाणाऱया महिलांच्या प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया लखनौ फ्रँचायजीच्या संघाचे नामकरण करण्यात आले आहे. कॅप्री ग्लोबल होल्डींग्ज प्रा. लि. च्या मालकीच्या या संघाचे नाव आता ‘युपी वॉरियर्स’ असे राहील.
भारतीय क्रिकेट मंडळाने महिलांसाठी ही स्पर्धा प्रथमच आयोजित केली आहे. या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होणार आहेत. युपी वॉरियर्स संघाचे फ्रँचायजी कॅप्री ग्लोबल होल्डींग्ज प्रा. लि. ने बीसीसीआयच्या क्रिकेटपटूंच्या लिलावावेळी 757 कोटी रुपये खर्च करण्याचे निश्चित केले आहे. युपी वॉरियर्सच्या लोगोचेही लवकरच अनावरण होणार आहे. या संघाच्या लोगोच्या चित्रामध्ये सारस पक्षी, तलवार, विंग्ज या चित्रांचा समावेश आहे. युपी वॉरियर्स संघासाठी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जॉन लेविस यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असून अर्जुन पुरस्कार विजेती भारताची माजी महिला क्रिकेटपटू अंजू जैन ही साहाय्यक प्रशिक्षक म्हणून राहील. या संघासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ऍश्ले नॉफ्की हे गोलंदाज प्रशिक्षक तर ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला क्रिकेटपटू तसेच भारतीय वंशाच्या लिसा स्थळेकर या संघाच्या मेंटॉर म्हणून राहतील. मुंबईमध्ये खेळविल्या जाणाऱया या स्पर्धेत एकूण 22 सामन्यांचा समावेश राहील. या स्पर्धेतील सामने मुंबईच्या बेबॉर्न स्टेडियम आणि नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जातील. पहिल्या महिलांच्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव मुंबईत 13 फेब्रुवारीला होणार आहे.









