Commencement of historic traditional triennial meeting ceremony
कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर निघाले किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया भवानी मातेच्या भेटीला
मालवण तालुक्यातील ऐतिहासिक देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी शुक्रवार १० फेब्रुवारी रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना झाले आहेत.
ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यास भाविकांनी सहभागी होऊन पारंपरिक शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार व्हावे. असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ कांदळगाव अध्यक्ष उदय लक्ष्मण राणे, सचिव संतोष नारायण परब देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळी ९ वाजता देव रामेश्वर यांचे आपल्या वारेसुत्र, तरंग व रयतेसह मालवणला प्रयाण केला, मार्गात सर्वत्र स्वागत करण्यात येत होते. दुपारी १२ वाजता जोशीमांड मेढा, मालवण येथे प्रस्थान, दुपारी १२ नंतर समुद्रमार्गे किल्ले सिंधुदुर्ग येथे देव रामेश्वर, शिवाजी महाराज व आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक भेट सोहळा, सायंकाळी ४ नंतर देव दांडेश्वर मंदिर, दांडी येथे आगमन, रात्री मौनीनाथ मंदिर, मेढा मालवण येथे मुक्काम, ११ रोजी सकाळी ८ नंतर कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वचन, सकाळी १० नंतर रामेश्वर मांड, बाजारपेठ येथे आगमन, दुपारी १२ नंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी ४ वाजता रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे प्रयाण.
श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी कुटुंबिय यांच्याकडून स्वागत केले जाते. त्यानंतर छत्रपतींकडून श्री देव रामेश्वराला नजराणा दिला जातो. याप्रसंगी सर्व वारेसुत्रांचाही सन्मान होतो. देव रामेश्वर आपल्यावतीने छत्रपतींना सन्मानित करतात. नंतर देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र व भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद आदान-प्रदान करतात. याची देही याची डोळा पहावा असाच हा सोहळा ठरतो.
मालवण / प्रतिनिधी









