प्रतिनिधी/ दापोली
दापोली पंचायत समितीचे माजी उपसभापती, जालगावचे माजी सरपंच व शिवसेना नेते मनोज भांबीड यांच्या घराला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये त्यांचे राहते घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले तरी सुदैवाने जीवितहानी टळली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्या प्राथमिक अंदाज भांबीड यांनी ‘तरूण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केला.
भांबीड यांचे जालगाव पांगारवाडी येथे वडिलोपार्जित घर होते. या घराला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत घरातील धनधान्य, रोख रक्कम, दागदागिने, सर्व कागदपत्रे, कपडे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. आग लागल्याचे कळता मनोज भांबीड यांनी तातडीने मेन स्वीच बंद केला. मात्र तोपर्यंत आगीने जोर धरला होता. त्यांनी तातडीने घरातील सर्वांना बाहेर काढले. यामुळे जीवितहानी टळली. आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी भांबीड यांया घराकडे धाव घेतली व आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
नगर पांयता बंब येईपर्यंत घर खाक
दापोली नगर पंचायतीचा लँडलाईन दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने वाडीतील दोघेजण बंब आणण्यासाठी नगर पंचायतीकडे गेले. मात्र दापोली नगर पंचायतीचा बंब घटनास्थळी येईपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते. नगर पंचायतीच्या बंबाने जोरदार पाण्याचा मारा करून ही आग शमवली. मात्र सकाळी पुन्हा आग धुमसत असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेनंतर पहाटेपासूनच मनोज भांबीड यांच्या घराकडे वारपूस करण्यासाठी रीघ लागली होती. सकाळीच माजी सभापती रउफ हजवानी, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे तसेच जालगावचे ग्रामसेवक यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने पाहणी केली. शिवाय पंचनाम्यालाही सुरुवात केली. दिवसभर भांबीड यों नातेवाईक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व भांबीड यांना धीर दिला.