वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
चीनने सुमारे 10 लाख तिबेटी मुलांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे केले आहे. चीनने या मुलांना सरकारकडून संचालित वसतीशाळांमध्ये बळजबरीने डांबले ओ. संयुक्त राष्ट्रसंघाच्या तीन मानवाधिकार तज्ञांनी यासंबंधीचा अहवाल तयार केला आहे. या तिबेटी मुलांना चीन त्यांची मातृभाषा, संस्कृती आणि इतिहासाच्या शिक्षणापासून दूर ठेवू इच्छित असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.
तिबेटी अल्पसंख्याकांच्या मुलांना चिनी भाषेत शिक्षण घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. तर वसतीशाळांमध्ये केवळ हान संस्कृतीबद्दल शिकविले जात आहे. हान हा चीनमधील बहुसंख्याक वांशिक समुदाय असून देशाच्या लोकसंख्येत त्याची हिस्सेदारी 92 टक्के इतकी आहे. तिबेटी मुलांसाठी वसतीशाळा प्रणाली आंतरराष्ट्रीय मापदंडांच्या विपरित संचालित केल्या जात आहेत. अनेक मुलांना स्वतःच्या मूळ भाषेचा विस्मरण पडू शकतो तसेच स्वतःच्या कुटुंबासोबत संवाद साधताना अडचणींना तोंड द्यावे लागू शकते अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
तिबेटी मुले स्वतःच्या मूळ भाषेसोबत स्वतःची ओळख गमावत आहेत. तिबेटी भाषेत स्वतःचे आईवडिल आणि आजी-आजोबांसोबत सहजपणे संवाद साधण्याची क्षमता ते गमावत आहेत. यामुळे त्यांची मूळ ओळख कमकुवत होत आहे. तिबेट क्षेत्रात सुरू असलेल्या वसतीशाळांची संख्या आणि त्यातील तिबेटी मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
इलेक्ट्रिक चिपद्वारे गर्भपात
चीनच्या सैन्याचे डॉक्टर्स गरोदर तिबेटी महिलांना लक्ष्य करत आहेत. गरोदर महिलांना बळजबरीने नेत त्यांच्या शरीरात एक इलेक्ट्रिक उपकरण टाकले जात आहेत. याद्वारे गर्भाला विजेचे झटके देत बळजबरीने गर्भपात घडवून आणला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या क्रूर कृत्यादरम्यान तिबेटी महिलांना भूल दिली जात नाही, त्या पूर्णवेळ वेदनेने तडफडत असतात.