आठ जागांपैकी पाच बिनविरोध, एक रिक्त आणि दोन जागांसाठी मतदान; शिवाजी विद्यापीठ निवडणुकीनंतरच्या पहिल्याच अधिसभेत शिक्कामोर्तब; अधिसभेतील 54 सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून देण्यात येणाऱ्या आठ जागेपैकी सात जागेवर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचेच वर्चस्व राहिले. सातपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या. तर खुल्या प्रवर्गातील शिक्षक एक आणि नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील एक अशा दोन जागेसाठी निवडणूक लागली. सिनेटमध्ये झालेल्या मतदानातून विकास आघाडीचे उमेदवार प्रा. रघुनाथ ढमकले शिक्षक गटातून तर पदवीधरमधून स्वागत परुळेकर निवडून आले. निवडणूक पार पडल्यानंतर व्यवस्थापन सदस्य पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
निवडणुकीनंतर पहिलीच अधिसभा झाली. या अधिसभेत व्यवस्थापन परिषदेसाठी दोन जागांच्या मतदानातून शिक्षक मतदारसंघातून प्रा. ढमकले यांनी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) उमेदवार प्रा. निवास वरेकर यांचा 28 मतांनी पराभव केला. सुटाचे आणखी एक उमेदवार प्रा. मनोज गुजर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. राखीव प्रवर्गातील एका जागेवर सुटाचे प्रा. बबन सातपुते बिनविरोध निवडून आले. पदवीधर मतदारसंघातून विकास आघाडीच्या स्वागत परूळेकर यांनी सुटाच्या श्वेता परूळेकर यांचा 31 मतांनी पराभव केला. तर एक मत अवैध ठरले. सभागृहातील 54 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून खुल्या प्रवर्गातून पृथ्वीराज पाटील, प्राचार्य गटातून प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, पदवीधर गटातून अमरसिंह राजपूत बिनविरोध निवडून आले. आठ पैकी सात सदस्य निवडून दिले तर एक जागा रिक्त राहिली. विद्यापीठातील विद्या परिषदेसह वेगवेगळ्या गटातील जागेवर विकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली व प्र-कुलगुरू पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिनेट सभा झाली. प्रभारी कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.
अधिसभेत सदस्यांमधून विद्यापीठ विद्या परिषदेवर व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून डॉ. मंजिरी मोरे यांची निवड झाली. अधिसभा सदस्य मधून विद्यापीठ स्थायी समितीवर निवडून द्यायच्या प्राचार्य गटातील एका जागेसाठी डॉ. सर्जेराव पाटील. प्राध्यापक गटातील एका जागेवर प्रा. प्रशांत खरात तर नोंदणीकृत पदवीधर गटातून डॉ. अजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती निवड समितीवर अभिषेक मिठारी यांची निवड झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम अंतर्गत तक्रार निवारण समितीवर विद्यापीठातील डॉ. शंकर हंगेरीकर शिक्षकेतर कर्मचारी गटातून डॉ. अर्चना कोलेकर यांची बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम अंतर्गत महाविद्यालय व मान्यता प्राप्त परिसंस्था यांची तपासणीसाठी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे या सदस्याची निवड केली.
सुटाच्या डॉ. प्रकाश कुंभार यांनी घेतली माघार
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या निवडणुकीत विकास आघाडीचे उमेदवार डॉ. शंकर हंगेरीकर यांच्या विरोधात सुटाचे उमेदवार डॉ. प्रकाश कुंभार होते. परंतू निवडणुकी दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने त्यांना माघार घेण्यासाठी वेळ न देताच हात वर करून मतदान घेत मतमोजणीला सुरूवात केली. तेंव्हा डॉ. कुंभार आणि मनोज गुजर यांनी आक्षेप घेत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर नियमाप्रमाणे वेळ दिल्यानंतर डॉ. कुंभार यांनी माघार घेतली. परंतू प्रशासनाची गडबडघाई लक्षात आणून देत अभिसभा सदस्यांसह विद्यापीठ प्रशासनाच्या डोळयात आंजन घातले.
गुलाल उधळत आनंद साजरा केला
व्यवस्थापन परिषदेवर विकास आघाडीचे उमेदवार स्वागत परूळेकर यांनी 31 मतांनी विजय मिळवल्यानंतर अभाविपच्या सदस्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. तसेच हालगीच्या तालावर विद्यापीठ परिसरात परूळेकर यांची मिरवणूक काढली.