पिंपरी / प्रतिनिधी :
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता एका उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० हजार रूपयांची चिल्लर आणली. एक रूपया, दोन रूपयांपासून दहा रूपयांपर्यंतची ही नाणी मोजताना निवडणूक अधिकार्यांची चांगलीच दमछाक झाली. नाणी मोजताना त्यांना अक्षरश: घाम फुटला. या प्रकारामुळे सर्वांनाच अभिनेता मकरंद अनासपुरे याच्या ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटातील प्रसंगाची आठवण झाली.
रयत विद्यार्थी परिषदेचे राजू काळे असे या अवलीया उमेदवाराचे नाव आहे. चिंचवड पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच इच्छूक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्यांवरही सकाळपासून कामाचा ताण होता. त्यातच राजू काळे यांनी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम म्हणून चक्क १० हजार रुपयांची नाणी आणली. या नाण्यांमध्ये एक रूपया, दोन रूपया, पाच रूपये आणि दहा रूपयांच्या नाण्यांचा समावेश होता. ही चिल्लर मोजताना निवडणूक अधिकार्यांना चांगलीच कसरत करावी लागली. कार्यालयातील सर्वच कर्मचार्यांना चिल्लर मोजण्यासाठी बसावे लागले.
अधिक वाचा : रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सची वाढ; EMI वाढणार
किमान अर्धातास ही चिल्लर मोजण्याचे काम सुरू होते. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्येही अभिनेता मकरंद अनासपुरे याने देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम भरताना नाणी आणल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. काळे यांच्या प्रतापामुळे सर्वांना या चित्रपटातील प्रसंगाची आठवण झाली.








