प्रतिनिधी /मडगाव
नवी मुंबई येथील अभिषेक बूक सेंटरकडून मडगावात पुस्तकांचे भव्य प्रदर्शन मांडण्यात आले असून यात विविध प्रकारची मराठी, हिंदी व इंग्रजी पुस्तके मांडण्यात आली आहेत. मडगावातील नानुटेल हॉटेलसमोरच्या दामोदर हॉटेल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे प्रदर्शन सुरू असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
200 व 300 रुपये प्रति किलो या दराने वजनावर या प्रदर्शनात मराठी, हिंदी व इंग्रजी पुस्तकांची विक्री करण्यात येत आहे. त्याशिवाय पुस्तकांच्या खरेदीवर 15 ते 50 टक्के सवलत देण्याची वेगळी योजनाही वाचकांसाठी राबविण्यात येत असल्याचे त्यांच्याकडून कळविण्यात आले आहे. या प्रदर्शनात इंग्रजी भाषेतील फिक्शन, नॉन-फिक्शन, उद्योग-व्यवसाय, शेअर बाजार यावरील तसेच बालसाहित्याची पुस्तके मांडण्यात आली आहेत. याशिवाय विविध प्रकारची मराठी पुस्तके मांडण्यात आली असून यात ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘स्वामी’, ‘युगंधर’, ‘श्रीमान योगी’ अशा विख्यात कादंबऱयांचा तसेच ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’, ‘अग्निपंख’, ‘उपरा’, ‘कोसला’, ‘प्राणायाम शक्ती’ आदी प्रसिद्ध पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या खरेदीवर सवलत देण्यात येत असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
सदर प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुले आहे. मडगावात अशा प्रकारच्या पुस्तक प्रदर्शनाचे प्रथमच आयोजन करण्यात आले असून चोखंदळ वाचकांनी या ठिकाणी भेट देऊन आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकांची खरेदी करावी. अधिक माहितीसाठी 8788605171 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









