प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच आंबा बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे. लवकरच या विषयीचा शासन निर्णय जाहीर होणार असणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री व जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. त्याचबरोबर आता चिपळूण शहरातील जगबुडी व वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याचे काम आता नाम फाउंडेशनला देण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी जिह्यातील महत्वाचे नगदी पीक म्हणून आंबा व्यवसायाकडे बघितले जाते. मात्र गेले काही वर्ष आंबा व्यावसायिक विविध समस्यांना तोंड देत आहेत. अवकाळी पाऊस, आंब्याला मिळणारा कमी दर अशातच वाढत चाललेला माकडांचा त्रास यामुळे आंबा व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या बाबत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्वाचा निर्णय जाहीर केला. आंबा बागायतदारांसाठी राज्य शासनाकडून आता आंबा बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे. या आंबा बोर्डात रत्नागिरी जिह्यातील आंबा व्यवसाय संघटनेतील 2 सदस्यांचा समावेश असणार आहे. या बोर्ड अंतर्गत आंबा व्यवसायासंदर्भातील सर्व समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अवकाळी पावसामुळे होणाऱया आंब्याची नुकसान भरपाई, आंब्यासाठी बाजारपेठ आणि आंब्याला योग्य दर मिळण्यासंदर्भात आंबा बोर्ड प्रयत्न करणार आहे. कोकणात वाढत चाललेला माकडांचा त्रास कमी करण्यासंदर्भात राज्य शासन स्तरावर चर्चा करण्यात आली आहे तसेच यासंदर्भात ठोस निर्णय आंबा बोर्डाकडून घेण्यात येणार असल्याचे सांमंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
या पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी सांगितले की, चिपळूण शहरातील वाशिष्टी व जगबुडी नदीतील गाळ उपसण्याचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी आता हे काम नाम फाउंढडेशनला देण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 72 लाख किंमतीचे डिझेल नाम फाउंढडेशनला वर्ग करण्यात येणार आहे. तसेच जिह्यातील अन्य नद्यांमधील गाळ काढण्याचे कामही आता वेगाने करण्यात येणार आहे. सावित्री नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजनकडून 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. तसेच शास्त्राr व गौतमी नदीतील गाळ काढण्यासाठीही जिल्हा नियोजनमधूनच आराखडा करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीतील विमानतळाला लो. टिळकांचे नाव देणार
जिह्यातील पहिल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास कुणबी समाजाचे नेते शामराव पेजे यांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच जिह्यातील कुणबी समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाकडून लवकरच सामाजिक न्यायभवन उभारण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या विमानतळाला लोकमान्य टिळकांचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लवकरच रत्नागिरी शहरात वैद्यकीय महाविद्यालय आता जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरु होणार आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरु व्हावे, यासाठी विशेष टीम काम करत असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.









