लेफ्टनंट जनरल उपेंद ख द्विवेदी यांचे वक्तव्य
@ वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही ठिकाणी सीमांवर निर्माण होणारे धोके आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचे उद्गार लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काढले आहेत. उत्तर कमांडकडून श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच अलंकरण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले. उत्तर कमांडकडेच एलओसी (पाकिस्तान) आणि एलएसी (चीन) सीमेच्या देखरेखीची जबाबदारी आहे.
ऑपरेशन स्नो लेपर्ड (लडाख), मेघदूत (सियाचिन) आणि रक्षक (काश्मीर)मध्ये शौर्य, प्रतिबद्धता आणि बलिदानाच्या प्रेरणादायी कार्यांसाठी जवान आणि अधिकाऱयांना 77 पुरस्कार प्रदान करण्यात आले. एलएसीनजीक पूर्व लडाखमध्ये गलवान तसेच देपसांग ला मध्ये चिनी घुसखोरीला रोखणाऱया जवान अन् अधिकाऱयांचा यावेळी गौरव करण्यात आला.
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सुरक्षेच्या स्थितीने विशेषकरून उत्तर आणि पश्चिम सीमांवर विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. कलम 370 हद्दपार करण्याचा निर्णय, गलवानमधील झटापट आणि कोरोना संकटानंतर अनेक नव्या आव्हानांदरम्यान भविष्यातील कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास भारतीय सैन्य तयार असल्याचे लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी म्हटले आहे.
भारतीय सैन्य देशाच्या लोकशाहीवादी परंपरा कायम ठेवत भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही निरंतर देखरेख ठेवून आहोत. सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहोत. स्वतःच्या राष्ट्रीय हितांच्या रक्षणासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जाणार आहेत. शस्त्रसंधी उल्लंघन, घुसखोरीचा प्रयत्न किंवा शत्रूकडून करण्यात आलेल्या कुठल्याही प्रकारच्या दुस्साहसाला कठोरपणे सामोरे जाऊ. मागील वर्षी घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळण्यात आले आहेत. तर दहशतवादविरोधी मोहिमांनी यशस्वीपणे धोके कमी केले आहेत. परंतु अमली पदार्थांद्वारे होणाऱया दहशतवादात वाढ झाली आहे. पाकिस्तान आता अमली पदार्थांचा एक नवे उपकरण म्हणून वापर करत असल्याने छुपे युद्ध अनेक पटीने वाढल्याचे उद्गार सैन्याधिकारी द्विवेदी यांनी काढले आहेत.
सामाजिक सलोख्याला धक्का पोहोचविण्याकरता ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थांसह शस्त्रास्त्रs पाठविण्याचा प्रकार शत्रूकडून सुरू आहे. अमली पदार्थांची सीमा पार तस्करी दहशतवादाला सहाय्य प्रदान करते. या प्रकारचा धोका रोखण्यासाठी ड्रोनविरोधी उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. जैसे थे स्थिती एकतर्फी बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना भारतीय सशस्त्र दलांकडून वेगवान, निडर प्रत्युत्तर देण्यात आले. शत्रूच्या कुठल्याही आक्रमक कारवाईला योग्य अन् कठोरपणे सैन्य सामोरे जाणार आहे. वरिष्ठ स्तरावर एलएसीच्या स्थितीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व लडाखमध्ये एलएससीवर प्रत्यक्ष गस्त घातली जात असून देशाचे सार्वभौमत्व सुनिश्चित केले जात असल्याचे ते म्हणाले.
4जी, 5 जी टॉवर्स स्थापन करणार
सैन्यासोबत आयटीबीपी आणि बीएसएफ यासारख्या निमलष्करी दलांसोबत समन्वय आणि ताळमेळ तसेच प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि सीमा सुरक्षा वाढविण्यासाठी समन्वय प्रशिक्षण, अभ्यास संयुक्तपणे केले जात आहेत. मागील 3 वर्षांमध्ये देशाच्या सीमांच्या सुरक्षेसाठी दरवर्षी तैनात केल्या जाणाऱया सुरक्षा दलांसाठी जवळपास 1500 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर गतिशक्ती पुढाकाराच्या अंतर्गत 800 किलोमीटरहून अधिक लांबीच्या नव्या रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे सीमावर्ती क्षेत्रातील संपर्कव्यवस्था बळकट झाली आहे. सैन्याने दूरसंचार मंत्रालयासोबत मिळून लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांमध्ये 4जी, 5जी टॉवर स्थापन करण्यासाठी 144 गावांची ओळख पटविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.









