ऑगस्टा वेस्टलँड घोटाळय़ातील आरोपी ः सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळय़ाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आरोपी ख्रिस्तियन मिशेल जेम्सची जामीन याचिका फेटाळली आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायाधीश पी.एस. नरसिंह आणि जे.बी. पारधीवाला यांच्या खंडपीठाने याप्रकरणी शिक्षेचा निम्मा कालावधी पूर्ण केला असल्याने जामिनावर सुटका करावी हा युक्तिवाद मान्य केला जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
मिशेल या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयासमोर नियमित जामिनासाठी दाद मागू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मिशेलने भादंविचे कलम 436 अ अंतर्गत जामिनाची मागणी केली आहे. शिक्षेसाठी निश्चित कमाल शिक्षेचा निम्मा कालावधी पूर्ण केला असल्यास संबंधित आरोपीची जामिनावर सुटका केली जाऊ शकते असे यात नमूद आहे.
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळय़ाप्रकरणी सीबीआय आणि ईडीने दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविले आहेत. 3,600 कोटी रुपयांच हा घोटाळा ऑगस्टा वेस्टलँडकडून 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सच्या खरेदीशी संबंधित आहे. ख्रिस्तियन मिशेल जेम्स हा ब्रिटनचा नागरिक आहे. डिसेंबर 2018 मध्ये दुबईत त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले होते आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे. मागील वर्षी न्यायालयाने जेम्सच्या जामीन याचिकांप्रकरणी सीबीआय आणि ईडीला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते.
जेम्सने कथितपणे नोंद गुन्हय़ासाठीच्या 50 टक्के शिक्षेचा कालावधी तुरुंगात काढला आहे. तसेच त्याच्या विरोधातील तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. जेम्स भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम 8 आणि 9 अंतर्गत तुरुंगात कैद आहे. याप्रकरणी कमाल शिक्षा 5 वर्षांची आहे, यातील सुमारे 4 वर्षे जेम्सने तुरुंगात काढली असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला होता.
आरोपी जेम्सचा ताबा सहजपणे मिळालेला नाही. तसेच भादंविचे कलम 436 अ हे ईडीच्या कारवाईवर लागू होत नसल्याचा युक्तिवाद तपास यंत्रणांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी केला आहे. यापूर्वी जेम्सची जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मागील वर्षी फेटाळली होती.









