पश्चिम आशियातील तुर्की व सीरिया या दोन देशांवर ओढवलेले भूकंपाचे संकट ही महाआपत्तीच म्हणावी लागेल. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या शेकडो इमारती, साडेचार हजारांवर नागरिकांचा गेलेला बळी, हजारोंच्या संख्येने जखमी झालेले नागरिक यातून या महाभयानक संकटाची कल्पना यावी. अद्याप अनेक जण ढिगाऱयाखाली अडकण्याची भीती असल्याने प्रत्यक्षात मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्तहानी किती होते, यावरून त्याची तीव्रता लक्षात येते. तुर्की, सीरियामधील निसर्गाच्या प्रकोपात या दोन्ही पातळय़ांवर मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. दोन्ही राष्ट्रांमधील घरे, इमारती यांची यात झालेली पडझड पाहता होत्याचे नव्हते होणे म्हणजे काय याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. मुळात हा प्रदेश भूकंपप्रवण म्हणून ओळखला जातो. कारण तो भूस्तरांच्या मोठय़ा प्रभंग रेषांच्या वर (फॉल्ट लाइन्स) वसलेला आहे. ही अशी रचना भूकंपासारख्या आपत्तीकरिता अनुकूल मानली जाते. मागचा इतिहास तपासला असता तुर्कीस आत्तापर्यंत कित्येकदा अशा विध्वंसकारी भूकंपाचा सामना करावा लागला आहे. गेल्या 25 वर्षांचा आढावा घेतला, तर त्यातून यावर योग्य तो प्रकाश पडतो. यात किती जीवितहानी झाली, याला गणती नाही. तथापि, 1999 नंतरचा हा दुसरा मोठा धरणीकंप ठरावा. या वर्षी देशाला दोन मोठय़ा भूकंपांना सामोरे जावे लागले. ऑगस्ट 1999 मधील 7.6 रिश्टर स्केलच्या धरणीकंपात 17 हजार 500 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर नोव्हेंबरमधील 7.2 रिश्टर स्केलच्या धक्क्यात 800 हून अधिक नागरिकांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. त्यानंतर जानेवारी 2020 पर्यंत अशा तीन-चार आपत्तींची नोंद आढळते. मागच्या दोन ते तीन वर्षांत या भागांत अधूनमधून धक्के बसले असले, तरी 7.8 रिश्टर स्केल क्षमतेचा सांप्रत धक्का हा सर्वांत मोठा ठरतो. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पहिला 7.5, दुसरा 7.8, तर तिसरा धक्का 6 रिश्टर स्केलचा धक्का असल्याचे सांगण्यात येते. किमान 20 भूकंपोत्तर धक्के किंवा आफ्टरशॉक, तर तब्बल 120 छोटय़ा धक्क्यांची नोंद होणे, यातून या धरणीकंपाची व्याप्ती वैशिष्टय़े ध्यानात यावीत. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ही टाळता येत नाही. तिला सामोरे जावे हे लागतेच. परंतु, अशा आपत्तीची काही पूर्वकल्पना मिळाली, काही पूर्वानुमान वर्तविले गेले, तर नक्कीच काही उपाययोजना करून संकटाची तीव्रता कमी करता येते. आता शास्त्रज्ञ प्रँक हूगरबीट्स यांनी तीन फेब्रुवारी रोजीच या भूकंपाच्या धक्क्याविषयी अंदाज व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. नजीकच्या काळात दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन या भागांत 7.5 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा तीव्र धक्का बसू शकतो, असे भाकीत हूगरबीट्स यांनी व्यक्त केले होते. याबाबत त्यांनी केलेले ट्विटही आता व्हायरल होत आहे. परंतु, भूकंपाच्या आधी त्याची कुठलीच दखल कुणी घेतल्याचे दिसत नाही. एखादा शास्त्रज्ञ किंवा संशोधक इतक्या मोठय़ा संकटाबद्दल आगाऊ सूचना देतो. मात्र, कोणत्याच देशातील शासन, प्रशासन ती गांभीर्याने घेण्याचे साधे कष्टही घेत नाही, यावरून एकूणच आपली बेफिकीरीच अधोरेखित होते. वास्तविक, हूगरबीट्स यांनी अंदाज व्यक्त केल्यानंतर तुर्की, सीरियासारख्या देशांनी सावध होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीकोनातून त्यांनी काही उपाय योजले असते, तर निश्चितपणे काही प्रमाणात का होईना जीवित व वित्तहानी टाळता आली असती. भविष्यात तरी याबाबत शहाणे व्हायला हवे. सगळे जग सीमांनी बांधले गेले असले, तरी नैसर्गिक प्रकोपाला कोणतीही सीमा नसते. निसर्गाने एकदा रुद्रावतार धारण केला, की तो कोणतीही बंधने पाळत नाही. भूकंपप्रवण क्षेत्राबाबत बोलायचे झाल्यास त्यात कुठल्या प्रांताचा समावेश होतो, हे महत्त्वाचे असते. अशा संवेदनशील ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता गृहीत धरावीच लागते. त्याचबरोबर संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा तैनात ठेवणे, कमीत कमी हानी होईल, अशी घरांची रचना करणे, यावर भर देणे अभिप्रेत असते. जपानसारख्या राष्ट्रात त्यादृष्टीकोनातून सातत्याने प्रयोग केले जातात. तुर्की, सीरियात या आघाडीवर आनंदीआनंद दिसला. भविष्यात अशा आपत्तींशी लढण्यासाठी देशांतर्गत यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच याकरिता परस्पर सहकार्य, साहचर्य कसे ठेवता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना व अन्य आंतरराष्ट्रीय संघटना आणि देशांनीही तुर्कीला मदत देऊ केली आहे. वैद्यकीय मदतीबरोबरच अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यक असेल. त्यासाठी सर्वच देश एकवटल्याचे चित्र सुखावहच. कोणत्याही जागतिक संकटात भारत कधीच मागे राहिलेला नाही. भारत सरकार वैद्यकीय मदत, इतर सामग्री तसेच एनडीआरएफची टीम पाठविणार आहे. यातून संकटग्रस्त राष्ट्रांना नक्कीच दिलासा मिळेल. सीरियातील दीर्घकालीन गृहयुद्धामुळे येथील कोटय़वधी नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. मागच्या दशकभरात तीन ते चार लाख लोकांचा यात बळी गेल्याचे सांगण्यात येते. बॉम्बस्फोटांमध्ये येथील जनजीवन बेचिराख झालेले असताना त्यात पुन्हा भूकंपाने कित्येकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणे, ही शोकांतिकाच ठरते. तुर्कस्थानसारख्या राष्ट्रात एकेकाळी केमाल पाशाने आधुनिक विचारांचा पुरस्कार केला. परंतु, येथील सत्ताधीश आता देशाला उलटय़ा दिशेने नेत आहेत. कट्टरीकरण, कर्मठपणा, धर्मांधपणा, युद्धखोरी हीच जर या देशांची ओळख बनत असेल, तर त्यांच्याकडून इतर कामे काय होणार? भूकंपानंतर या देशांमधील आरोग्य व वैद्यकीय पातळीवर उडालेला बोजवाराच बरेच काही सांगून जातो. यापुढे तरी या राष्ट्रांनी, तेथील कुरापतखोर घटकांनी वास्तवात येऊन विचार केला पाहिजे. आरोग्यासह लोकहिताचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यायला हवा. या संकटातून एवढे शहाणपण आले, तरी ती मोठी गोष्ट ठरेल.
Previous Articleटाटा स्टीलचा समभाग घसरणीत
Next Article पतंजली फूडस्चा समभाग तेजीच्या दिशेने
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








