ओटीटीवर दाखविणार स्वतःचे अभिनयकौशल्य
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या स्वतःचा हॉट लुक्स, स्टाइल आणि फॅशनमुळे चर्चेत असते. परंतु यावेळी अभिनेत्री स्वतःच्या ओटीटी पदार्पणावरून चर्चेत आली आहे. अनन्या पांडेने नव्या वर्षात ओटीटीवर स्वतःचे अभिनय कौशल्य दाखवून देण्याची तयारी केली आहे. चाहत्यांच्या तिच्या ओटीटी प्रोजेक्टची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती.
अनन्या लवकरच करण जौहरच्या प्रॉडक्शन हाउसकडून निर्माण होणारी वेबसीरिज ‘कॉल मी बे’मध्ये दिसून येणार आहे. अनन्या पांडेला बॉलिवूड पदार्पणाची संधी करण जौहरनेच दिली होती. करणच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

कॉल मी बे या वेबसीरिजमध्ये अनन्या एका अब्जाधीश फॅशन आयकॉनची भूमिका साकारणार आहे. एका घोटाळय़ानंतर कुटुंबापासून स्वतःला दूर केलेल्या युवतीची ही भूमिका असणार आहे. सीरिजच्या निर्मात्यांनी ‘कॉल मी बे’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी कॉलिन डी कुन्हा यांना सोपविली आहे.
अनन्या पांडेची ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केली जाणार आहे. अनन्या पांडे ही चर्चेत राहणारी अभिनेत्री असली तरीही तिला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळविता आलेले नाही. अनन्याला आता या वेबसीरिजकडून मोठय़ा यशाची अपेक्षा आहे.









