हृदय, मेंदू अन् पोटावर होतो प्रतिकूल परिणाम
संतापाची भावना पूर्ण शरीराला आजारी करून सोडते. संताप हा मेंदूच नव्हे तर हृदय आणि पोटाचेही आरोग्य बिघडवून टाकतो आणि जुन्या आजारांना पुन्हा बळावून टाकतो असे एका संशोधनात दिसून आले आहे.
संताप किंवा हताशेच्या स्थितीत शरीराच्या न्यूरो हॉर्मोनल सिस्टीमवर मोठा दबाव पडतो, तो आपत्कालीन स्थितीपर्यंत पोहाचू शकतो. दीर्घकाळात यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. संताप मानवी कार्डियोवस्कुलर सिस्टीमपासून नर्व्हस सिस्टीमपर्यंत प्रभावित करत असल्याची माहिती बाल्टीमोरच्या जॉन हॉपकिन्स रुग्णालयातील कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर इलन शोर विटस्टीन यांनी दिली आहे.

संताप धमन्यांना संकुचित करतो. पूर्वीपासून एखादा कार्डियोवस्कुलर आजार म्हणजे उच्च रक्तदाब किंवा हाय कोलेस्ट्रॉल असल्यास हृदयविकाराचा झटका बसू शकतो. संतापामुळे रक्तदाब वाढणे, रक्तवाहिन्या आंकुचित पावण्यासह इम्यून सिस्टीपासून पचनव्यवस्थेला धक्का पोहोचतो. हे सर्वकाही एकाचवेळी घडत असल्याने धमन्या ब्लॉक होतात असे डॉक्टर विटस्टीन म्हणाले.
योग्य निर्णय घेता येत नाहीत
संतापात मेंदू योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कुठल्याही विशेष कारणाने उत्तेजित झाल्यास मेंदू काहीतरी करून दाखविण्यासाठीही प्रेरित होतो. माणूस संतापात स्वतःला न रुचणाऱया गोष्टी बोलतो आणि करतो देखील. संतापात स्मरणशक्ती कमकुवत होते, तसेच कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नसल्याचे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील बिहेवियरल न्यूरोसायन्सचे प्राध्यापक डॉक्टर रोयसे ली यांनी सांगितले आहे.

पोटाच्या समस्या
भावना आणि पोटाचा मोठा संबंध आहे. संतापामुळे गॅस्ट्रोच्या समस्या होऊ लागतात. अन्न पचत नाही. संतापात पोटामधील स्नायू अधिक सक्रीय होतात. अनेकदा आतडय़ातील स्वतःच्या जागेतून हटतात. याचमुळे डायरिया देखील होऊ शकतो. अनेकदा संतापामुळे भूक लागणे बंद होते असे डॉक्टर एटिनजिन यांनी सांगितले.
तंदुरुस्त रहा, पूर्ण झोप घ्या
संताप रोखणे नेहमीच शक्य होत नाही, परंतु त्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. ध्यान, प्राणायामसोबत स्वतःला तंदुरुस्त ठेवा आणि पूर्ण झोप घ्या. यामुळे संतापाची तीव्रता कमी करता येईल असे येल स्कुल ऑफ मेडिसीनमधील क्लिनिकल मानसोपचारतज्ञ डॉक्टर विलियम बर्ग यांनी म्हटले आहे.









