केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनच्या हेरगिरी करणाऱया फुग्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतातही चीनने स्वतःचा हेरगिरी करणारा फुगा पाठविला होता असा दावा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याची तिन्ही दले एकत्र युद्धाभ्यास करत असताना चीनने हा फुगा भारतीय क्षेत्रात पाठविला होता असा दावा केला जात आहे. अमेरिकेने चीनच्या या संशयास्पद फुग्याला शनिवारीच नष्ट केले होते. अमेरिकेने लढाऊ विमानांच्या मदतीने दक्षिण कॅरोलिनाच्या किनाऱयावर फुग्याला आकाशातच नष्ट केले होते.

डिसेंबर 2021 पासून जानेवारी 2022 दरम्यान चीनच्या हेरगिरीयुक्त फुग्याने भारताच्या सैन्यतळाची हेरगिरी केली होती. यादरम्यान चीनच्या फुग्याने अंदमान-निकोबार बेटसमुहाची राजधानी पोर्ट ब्लेअरवरून उड्डाण केले होते असा दावा अमेरिकेचे संरक्षणतज्ञ एचआय सटन यांनी केला आहे. डिसेंबर 2021 मध्येच भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी अंदमान-निकोबारमध्ये संयुक्त युद्धाभ्यास केला होता. ट्राय सर्व्हिस कमांडदरम्यानच चीनचा हा हेरगिरी करणारा फुगा अंदमान-निकोबारमध्ये पाहिले गेले होते.
चीनचा हेरगिरी करणारा फुगा कॅनडानंतर अमेरिकेच्या हवाईक्षेत्रात पोहोचला होता. तसेच चीनचा आणखी एक फुगा दक्षिण ओरिकेतही दिसून आला होता. चीनच्या या कृत्यामुळे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी स्वतःचा चीन दौरा टाळला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या आदेशानंतर तेथील वायुदलाने चीनच्या या फुग्याला नष्ट केले होते. या फुग्यावर एआयएम-9एक्स साइडविंडर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेपर्यंत हा फुगा पोहोचविण्यासाठी चीनने अल्यूटियन आयलँड, अलास्का आणि कॅनडाचा मार्ग निवडला होता.
भारत आणि अमेरिकेत ज्या हेरगिरीयुक्त फुग्याचा दावा करण्यात येतोय, त्याचा इतिहास दुसऱया महायुद्धाशी निगडित आहे. कॅप्सूलच्या आकाराचा हा फुगा अनेक चौरस फूटांइतका मोठा असतो. हा फुगा जमिनीपासून अत्यंत अधिक उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम असतो, यांचा वापर प्रामुख्याने हवामानाशी निगडित माहिती मिळविण्यासाठी केला जातो. परंतु आकाशात अत्यंत अधिक उंचीवर उडण्याच्या क्षमतेमुळे या फुग्यांचा वापर हेरगिरीसाठी देखील केला जाऊ लागला. चीनचा हा फुगा अमेरिकेत 60 हजार फुटांच्या उंचीवर उड्डाण करत होता. या फुग्यांची उड्डाणकक्षा प्रवासी विमानांपेक्षा खूपच अधिक आहे. बहुतांश प्रवासी विमाने 40 हजार फुटांपर्यंतच्या उंचीवर उड्डाण करत असतात. तर लढाऊ विमानांची उड्डाणकक्षा 65 हजरा फुटांपर्यंत असते.
उपग्रहापेक्षा अधिक प्रभावीपणे हेरगिरी
अमेरिकेच्या वायुदलाच्या एअर कमांड आणि स्टाफ कॉलेजच्या एका अहवालानुसार हा हेरगिरीयुक्त फुगा अनेकदा उपग्रहांपेक्षा अधिक सक्षम गुप्तचर यंत्र ठरत असते. हा फुगा उपग्रहापेक्षा अधिक सहजपणे कुठल्याही क्षेत्राला स्कॅन करू शकतो. तसेच त्यांच्याद्वारे त्यांना पाठविणारे देश शत्रूविरोधातील संवेदनशील माहिती जमवू शकतात. उपग्रहाद्वारे कुठल्याही भूभागावर नजर ठेवणे महाग ठरत असते कारण यासाठी अत्यंत अधिक किंमत असलेल्या स्पेस लाँचर्सची गरज भासते. दुसरीकडे हेरगिरीयुक्त फुगे उपग्रहापेक्षा कमी किमतीत हेच काम करू शकतात.









