वार्ताहर /पालये
रोटरी क्लब म्हापसा एलिटतर्फे तुये-पेडणे येथील आत्मविश्वास विशेष स्कूलला पीठ दळण यंत्र प्रदान करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष परेश पालयेकर, सचिव नंदकिशोर आर्सेकर, तुये सरपंच सुलक्षा नाईक, क्लबचे संचालक दत्ताराम बिचोलकर, सदानंद आर्सेकर, स्कूलचे संस्थापक सीताराम गावडे, स्कूलच्या प्रमुख सुजाता गावडे, शिक्षकवर्ग, पालक उपस्थित होते.
संचिता किनळेकर हिने एकेरी नृत्य सादर केले. तसेच ‘इतनीसी हसी’ या गाण्यावर मुलांनी सुंदर नृत्य सादर केले. नंदकिशोर आर्सेकर यांनी विद्यालयातील मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले. स्कूलसाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपण पंचायतस्तरावर मिळवून देईन, असे सरपंच सुलक्षा नाईक म्हणाल्या.
विशेष मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे. तसेच त्यांना प्रोत्साहन लाभावे या हेतूने क्लबच्यावतीने पीठ यंत्रणा सुपूर्द करण्यात आली आहे. क्लबतर्फे यापुढेही स्कूलला सहकार्य लाभेल, असे परेश पालयेकर म्हणाले. सूत्रसंचालन शिक्षिका विनया देसाई यांनी केले, तर आभारप्रदर्शन सीताराम गावडे यांनी केले.









