कुळे पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांचा सवाल : कळसा भांडुरा प्रकल्प व अमित शाहांच्या व्यक्तव्याचा जाहीर निषेध,कुळे-शिगांव ग्रामसभा पिण्याच्या पाणीप्रश्नी तापली
प्रतिनिधी /धारबांदोडा
म्हादई नदीवरील कळसा भांडुरा प्रकल्पामुळे दुधासागर नदी आटण्याचा धोक्याने कुळे शिगांव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्तव्याच्या व गोवा सरकारचा निषेध करण्याचा ठरावही माजी पंचसदस्य निलेश वेळीप यांनी ग्रामसभेसमोर मांडला तो एकमताने मंजूर करण्यात आला. सरपंच गोविंद शिगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कुळे शिगांव ग्रामपंचायतीची ग्रामसभा रविवारी झाली.
कळसा भांडुरा प्रकल्पामुळे ‘दुधसागर नदी’ आटण्याचा धोका असून जगप्रसिद्ध अशा ‘दुधसागर’ धबधब्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. भगवान महावीर अभयाण्यावर त्याचे दुष्परिणाम सोसावे लागणार असून येथील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होणार आहे. शेजारील नद्या व नाले आटणार असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून या प्रकल्पाला पुर्ण विरोध करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाच्या दुष्परिणामाची माहिती खुशाली मामलेकर व नरेश शिगांवकर यांनी सविस्तर ग्रामसभेसमोर मांडली.
आर्थिक वर्ष 2023-24 सालासाठी सुमारे साडेचार कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकाला यावेळी मंजूरी देण्यात आली. मात्र या अंदाजपत्रकात ‘सार्वजनिक काम’ या मथळयाखाली असलेल्या लोकल ऑथोरीटीझ (स्थानिक अधिकारी) या वाक्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला. यावर सविस्तर माहिती पुरविण्याची मागणी निलेश वेळीप यांने यावेळी केली. पुढील ग्रामसभेत यावर माहिती देण्याचे पंचायतीने मान्य केले.
ग्रामिण आरोग्य केद्राविषयी चर्चा
कुळे येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामिण आरोग्य केंद्राचे बांधकाम सध्या बंद आहे. हे आरोग्य केंद्र लवकारत लवकर पुर्ण व्हावे अशी लेखी मागणी नरेश शिगावकर यांनी केली होती. या आरोग्य केद्राच्या बांधकामाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमदार गणेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर जर योग्य तो तोडगा निघाला नाही तर पुढील कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
काही गाडे धारकांनी कुळे बाजारातील रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. ते हटविण्याची मागणी दामोदर शिरोडकर यांनी लेखी स्वरूपात केली होती. कुळे हे पर्यटन स्थळ आहे. येथे देश विदेशातील पर्यटक येतात, त्यामुळे सर्व रस्ते खुले असणे महत्वाचे आहे. काही गाडेधारकांनी रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण केले आहे. त्यामुळे कुळे पंचायतीचे नाव खराब होत आहे. रस्त्याच्या बाजूची जागा पर्यटकांना फिरण्यासाठी मोकळी करावी अशी मागणी त्यांनी केली. ज्या गाडेधारकांनी अतिक्रमण केले आहे त्यांना नोटीस जारी करून रस्ता खुला करणार असल्याचे पंचायतीने सांगितले.
सौझामळ येथे पिण्याच्या पाण्dयाची कमतरता
सौझामळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पाणी प्रकल्पातून काही ठिकाणी पूरक प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. या प्रकल्पातून हरीयाळीमळ, सौझामळ व मायडा या वाड्यांवर पाणीपुरवठा होत आहे. मात्र पाणी साठविण्यात येणारी टॅक वेळेवर भरली जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. यावर तोडगा काढावा अशी मागणी दिलीप गावकर यांनी केली. शिवाय मायडा येथे जाण्यासाठी रेल्वे उ•ाण पुल बांधावा अशी मागणी आपण केली होती, याबद्दल पंचायतीने कोणता पाठपुरावा केला आहे याची विचारणाही त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना रेल्वे मुख्यालयात यासंबंधी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले.
रेल्वे दुपदरीकणासाठी दिलेला ना हरकत दाखला मागे घेण्याची मागणी
कुळे ते केरलरलॉक पर्यंत रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी कुळे पंचायतीने 2109 साली सशर्त ना हरकत दाखला दिला होता. मात्र ज्या शर्ती दाखल्यात घालण्यात आल्या होत्या, त्यापैकी एकही शर्त रेल्वे विभागाकडून पुर्ण करण्यात आलेली नाही. या कारणाने ना हरकत दाखला मागे घेण्यात यावा अशी लेखी मागणी नरेश शिगावकर यांनी केली. याबाबत दाखला मागे घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरवर्षी पंचायतीतर्फे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीचा सन्मान केला जात आहे. यासाठी योग्य व्यक्तीची निवड व्हावी. गरज पडल्यास एक समिती गठन करावी अशी मागणी सत्यवान खेडेकर यांनी केली.
पाणी प्रकल्प लवकर पुर्ण व्हावा
राक्षस मळकेश्वर देवालयाजवळ होऊ घातलेला पाणी प्रकल्प पुर्ण होण्dयास किती दिवस लागतील असे विचारणा सागर गांजेकर यांनी केली. प्रकल्पास विलंब होत असल्यास, पंचायत क्षेत्रात असलेल्या विहीर स्वच्छ करून त्यात पंप बसवून स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा नागरिकांसाठी करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. सरपंच गोविंद शिगावकर यांनी सर्वाचे स्वागत केले. सचिव सुषमा कवळेकर यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर करून मान्यता घेतली. यावेळी उपसरपंच नेहा मडकईकर, पंचसदस्य अश्विनी देसाई, बेनी आझावेदो, अजय बांदेकर, प्रसाद गावकर, साईश नाईक, सोनम डोईफोडे, अनिकेत देसाई उपस्थित होते. प्रकाश खांडेपारकर, वासुदेव देसाई, गौतम कामत, जयराम देसाई, शशिकांत वेळीप यांनी चर्चेत भाग घेतला. गट विकास कार्यालयातर्फे माया खांडेपारकर उपस्थित होत्या.









