राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी जरी जिंकली असली तरी शिवसेनेचा मात्र पराभव झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकूण 5 जागांपैकी काँग्रेसला 2 जागांवर, एका जागेवर अपक्ष आणि प्रत्येकी एक जागा भाजप आणि राष्ट्रवादीला मिळाली आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महाविकास आघाडीत तिकीट वाटप करताना जुन्या आघाडीच्या फॉर्म्युल्याचा विचार केला जात असल्याने केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झुकते माप दिले जात असल्याने, सेनेला एवढे मोठे भगदाड पडल्यानंतरही सेना नेतृत्वाबाबत आणि पक्षाच्या कार्यपध्दतीबाबत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभेत बहुमत सिध्द केल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत संख्याबळ वाढविण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजप-शिंदे गट यांनी एकत्र निवडणूक लढविली, मात्र या निवडणूकांचा निकाल पाहता महाविकास आघाडीला 3 जागा मिळाल्या. त्यातील दोन जागा काँग्रेसला आणि एक जागा राष्ट्रवादीला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे 5 जागांपैकी काँग्रेसने तीन जागा तर राष्ट्रवादीने एक जागा आणि शेकाप पुरस्कृत एका जागेवर उमेदवाराची घोषणा झाली. मात्र ऐनवेळी नाशिक पदवीधर मतदार संघात ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार होता. त्या ठिकाणी झालेल्या घोळामुळे शेवटी शिवसेनेला या ठिकाणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यावा लागला, हा घोळ शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून घातला गेला. ज्या ठिकाणी काँग्रेसचा तुल्यबळ उमेदवार होता, मात्र काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे एबीफॉर्मचा घोळ झाला आणि या जागेवर अपक्ष लढत असलेल्या शुभांगी पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेने त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि शिवसेनेच्या वाटय़ाला अधिकृत नसली तरी ही एकमेव जागा वाटय़ाला आली.
अमरावतीत शिवसेनेचा उमेदवार काँग्रेसमध्ये
अमरावती पदवीधर मतदार संघ हा काँग्रेसच्या वाटय़ाला गेला होता, मात्र येथे मतदार नोंदणी, बैठका अशी सर्व जबाबदारी धीरज लिंगाडे यांच्याकडे सोपविली होती. लिंगाडे यांनी जोरदार तयारी केली होती. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेल्यानंतरही लिंगाडे यांनी मतदार संघात मोर्चेबांधणी करताना संपर्क अभियानावर भर दिला. मात्र हा मतदार संघ काँग्रेसला गेल्याने शिवसेनेच्या लिंगाडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विजय जरी मिळवला असला तरी या विजयामुळे काँग्रेसची एक जागा वाढली असून राज्याचे माजी मंत्री असलेले आणि भाजपचे महत्त्वाचे नेते असलेले रणजित पाटील यांचा पराभव हे या निकालाचे वैशिष्टय़. एकीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश होत असताना निवडणुकीच्या माध्यमातून आता लिंगाडे सारखे कार्यकर्ते यांना नाईलाजाने केवळ निवडणुकीच्या तडजोडीकरता दुसऱया पक्षात जावे लागणे हे ठाकरे गटासाठी दुर्देवच म्हणावे लागेल. भाजपसोबत असताना अन्याय केल्याची भाषा करणाऱया शिवसेना ठाकरे गटावर महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. अमरावती पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार हा भाजपचा असल्याने महाविकास आघाडीत तडजोड करता आली असती. शिवसेनेसाठी हा मतदार संघ काँग्रेसने सोडायला हवा होता, अशी भावना व्यक्त केली जात असून अजुनही तोच कित्ता का पक्षाकडून गिरवला जातो असेही बोलले जात आहे.

आधी नागपूरची जागा मग नाशिकची जागा शिवसेनेच्या वाटय़ाला
महाविकास आघाडीच्या बैठकीत पहिल्यांदा नागपूरची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जागा काँग्रेसला घेत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा दिला. भाजपसोबत असतानाही भाजपनेही संख्याबळ सेनेचे वाढवताना उमेदवार आपले दिले होते. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या पालघरचे राजेंद्र गावित यांना भाजपने पालघरची जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्यास सांगितली होती तर सातारा लोकसभा निवडणुकीतही उदयनराजेंच्या विरोधात भाजपचे उमेदवार नरेंद पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी पडणाऱया जागा शिवसेनेच्या वाटय़ाला भाजपने दिल्याचा आरोप केला जात होता. मविआत तर सेनेच्या वाटय़ाला काय? म्हणजेच आघाडी असो किंवा युती शिवसेनेला मात्र दुय्यम स्थान मिळत आहे, शिवसेनेला केवळ मुंबई महापालिकेतच रस आहे? अजुनही मुंबई-ठाणे बाहेर शिवसेना निवडणुकीत आत्मियता दाखवत नसल्याचा आरोप केला जात आहे. मात्र ज्या जागांवर काँग्रेसचा विद्यमान आमदार डॉ.सुधीर तांबे नाशिक पदवीधर मधून आमदार होते, त्या जागेवर मात्र ऐनवेळी झालेल्या घोळामुळे अखेर काँग्रेसच्या घोळामुळे झालेल्या जागेवर शिवसेनेला अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यावा लागतो. शिवसेना एवढी हतबल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चिंचवडची जागाही शिवसेनेला नाही
कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी या निवडणुकीतही पुन्हा एकदा मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एका जागेवर वाटणी केली आहे. विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागांवर मविआचा आमदार नाही. कसबा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कलाटे यांनी 2014 ला शिवसेनेतून तर 2019 राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष निवडणूक लढताना एक लाखाच्या वर मते घेतली होती. आता महाविकास म्हणून जर ही निवडणूक लढविली जात असेल तर चिंचवडची जागा शिवसेनेला सोडणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा शिवसेना ठाकरे गट फक्त हिम्मत असेल तर वरळीमधून निवडणूक लढवा किंवा त्वरीत मुंबई महापालिका निवडणूक घेण्याचेच आव्हान करत राहणार आणि तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्रात निम्या निम्या जागा घेत पक्षाचा विस्तार करत राहणार. त्यामुळेच महाविकास आघाडी जरी जिंकत असली तरी शिवसेना मात्र हरली आहे.
प्रवीण काळे








