भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाला लाभदायक : पर्यटकांना वाघाचे आकर्षण
बेळगाव : भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या मिनी टायगर सफारीला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे केवळ चार महिन्यांत मिनी टायगर सफारीतून संग्रहालयाला आठ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. येथील राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, मगर, अस्वल, हरिण, चितळ, सांबर, तरस, कोल्हे, माकड यासह विविध पक्षी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्याबरोबर वाघाला जवळून पाहता यावे, यासाठी मिनी टायगर सफारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी विशेष वाहनाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी या टायगर सफारीला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, विविध पर्यटक आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे टायगर सफारीतून व्यवस्थापनाला समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. केवळ चार महिन्यांत आठ लाखांहून अधिक महसूल मिळाला आहे. टायगर सफारीला प्रत्येकी 20 रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. विशेषत: वाहनाजवळ आलेला वाघ पाहता येत असल्याने टायगर सफारीला प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे उत्पन्नात भर पडू लागली आहे.









