वृद्ध जोडप्याची मनस्पर्शी प्रेमकहाणी
पहिले प्रेम हा शब्द तुम्ही अनेक लोकांकडून ऐकला असेल. पहिले प्रेमच आयुष्यभर सोबत रहावे अशी बहुतांश लोकांची इच्छा असते, परंतु अनेकदा इच्छा नसतानाही पहिले प्रेम विसरावे लागते. अमेरिकेच्या एका जोडप्याची मनस्पर्शी प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रेकअपच्या 43 वर्षांनी या जोडप्याने विवाह केला आहे.
जीन वॉट्स आणि त्यांचे प्रियकर स्टीफन वॉट्स यांची ही कहाणी आहे. 1971 मध्ये महाविद्यालयात असताना दोघांची भेट झाली. तेव्हा जीन यांचे स्टीफन हे सीनियर होते. दोघेही परस्परांना पसंत करत होते. जीन यांनी स्वतःच्या आईला ही बाब सांगत विवाहाची इच्छा व्यक्त केली, परंतु तिच्या आईने याला नकार दिला होता. आपल्या श्वेतवर्णीय मुलीने एका बिगरश्वेतवर्णीय पुरुषाशी विवाह करू नये असे तिच्या आईचे म्हणणे होते.

7 वर्षांपर्यंत लपून-छपून डेटिंग
तरीही या जोडप्याने लपून-छपून 7 वर्षांपर्यंत डेटिंग केले. परंतु जीन महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर तिने एक अशी नोकरी सुरू केली, ज्यात दीर्घ प्रवास करावा लागत होता. यामुळे दोघांच्या गाठीभेटी कमी झाल्या. माझी आई अत्यंत चिडचिडी होती, कुटुंबाचा विचार करत मी प्रेमाला दूर लोटले असे 69 वर्षीय जीन यांनी सांगितले. याचदम्यान त्यांचा विवाह झाला, परंतु तो फारकाळ टिकला नाही. अनेक वर्षांनी त्यांना स्टीफन यांचा शोध घ्यावा असे वाटले.
2021 मध्ये स्वतःच्या भाचीच्या माध्यमातून त्यांनी स्टीफन यांना शोधून काढले. स्टीफन हे बेघर होते तसेच त्यांना दोनवेळा हृदयविकाराचा धक्का बसला होता. याचमुळे ते नर्सिंग होममध्ये राहत होते, परंतु जीन यांना पाहताच त्यांनी त्वरित ओळखले. स्टीफन अद्याप माझ्यावर प्रेम करतो हे मला माहित होते असे जीन म्हणाल्या. त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. जीन अद्भूत आहे, ती माझे हृदय आणि आत्मा आहे, मी नेहमी तिच्यासोबत राहू इच्छितो असे उद्गार स्टीफन यांनी काढले आहेत.
लाखो लोकांकडून लाइक्स
इन्स्टाग्रामवर पीपल नावाच्या अकौंटवर ही स्टोर पोस्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत 1.18 लाख लोकांनी याला लाइक केले आहे. तर हजारो लोकांनी कॉमेंट केली आहे.









