26 कोटी दंड थकित, 50 टक्के भरून दंडातून मुक्त व्हा, मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस. ए. यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
वाहतुकीचे नियम तोडून वाहने चालविल्या प्रकरणी अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून बेळगाव शहर तसेच जिल्ह्यामध्ये अनेप भागातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंडाच्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही दंड भरला नाही. त्यामुळे सरकार व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या असलेला दंड 50 टक्के कमी करून 50 टक्के करण्याची मुभा देण्यात आली आहे. या संधीचा सर्व वाहनचालकांनी लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस.ए. यांनी केले.
दंड भरून घेण्याच्या या मोहिमेला प्रारंभ झाला आहे. तर शनिवार दि. 11 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्येही हा दंड भरून घेण्यात येणार आहे. तरी त्याचा लाभ वाहनचालकांनी घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय लोकअदालतमधून प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकअदालतीला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. चेक बाऊन्स, बँकेची कर्जवसुली, सोसायटीची कर्जवसुली याचबरोबर कौटुंबिक आणि फौजदारी गुन्हे देखील निकालात काढले जात आहेत. तेव्हा त्याचा लाभ घ्यावा, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
यावेळी उपस्थित असलेले पोलीसआयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या म्हणाले, जिल्ह्यामध्ये एकूण वाहनचालकांवरील 28 हजार खटले प्रलंबित आहेत. जवळपास 26 कोटी रुपये दंड भरावयाचा आहे. जर सर्वांनी सहकार्य केले तर हे सर्व खटले निकालात काढण्यास आम्हाला सोयीचे ठरणार आहे. 13 कोटी रक्कम दंडामधून मिळणार आहे. तेव्हा दंड भरण्यासाठी पुढे यावे, असे त्यांनी सांगितले.
दंड भरण्यासाठी दक्षिण रहदारी पोलीस स्थानकाबरोबरच बेळगाम वनमध्येही व्यवस्था केली आहे. तेव्हा ज्यांना नोटीसा आल्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून असलेल्या दंडाची माहिती घेऊन त्यामधील 50 टक्के दंड भरावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. दुचाकीबरोबरच सर्वच वाहनांचा दंड निम्मा घेतला जाणार आहे. तेव्हा सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी उपस्थित होते.









