आरजीकडून शिरोडा येथे जनजागृती सभा
शिरोडा:-
भाजपचे डबल इंजिन सरकार गोवेकरांसाठी नसून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी म्हादईचा सौदा केला आहे. अमित शहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे गोवा सरकारशी मिळून म्हादई प्रश्न सोडविल्याबद्दल केलेल्या अभिनंदनावरुन हे सिद्ध होत आहे. भाजपने कर्नाटकला म्हादईचा सौदा केल्याची टीका आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केली.
रिव्होलुशनरी गोवन्सतर्फे म्हादई नदी विषयी जनजागृती सभा शिरोडा येथे घेण्यात आली. त्यावेळी सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर, पर्यावरण तज्ञ नंदकुमार कामत यांची उपस्थिती होती. म्हादईसंदर्भात फक्त रेव्होलुशनरी गोवन्सकडून गंभिरतेने बीजेपी सरकारविऊद्ध लढा सुरु आहे. आरजीही गोवेकरांसाठी आहे. म्हादईचे पाणी वळविल्यानंतर राज्यावर होणाऱ्या परिणामांविषयी जनजागृती करण्याचे काम आरजी करत आहे, असे मनोज परब यांनी सांगितले. पर्यावरण तज्ञ नंदकुमार कामत म्हणाले की, जर म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळविली तर राज्यात बिकट परिस्थिती निर्माण होईल. राज्यातील जनता पाण्यासाठी तळमळेल. प्रत्येक गोवेकरानी आता पेटून उठण्याची आज गरज असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.









