वृत्तसंस्था/ बेंगळुरू
बॉर्डर-गावस्कर चषकासाठीची भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत असून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन त्याच्या तर्जनीच्या दुखापतीतून वेगाने सावरत असला, तरी या कसोटीसाठीच्या ऑस्ट्रेलियाच्या अंतिम अकरा खेळाडूंत त्याला स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचे प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट केले आहे.
सदर 23 वषीय वेगवान गोलंदाजाच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पर्थमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत अॅनरिच नॉर्टजेचा चेंडू आदळून त्याच्या तर्जनीचे हाड फ्रॅक्चर झाले होते. अलूरमधील जाळ्यात त्याने काही काळ गोलंदाजीचा सराव केला. सध्या ऑस्ट्रेलियाचे चार दिवसीय सराव शिबिर चालू असून त्यावेळी पत्रकारांना मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, ‘आम्ही ग्रीनच्या बाबतीत अजून पक्का निर्णय घेतलेला नाही. गोलंदाजी करताना त्याला अस्वस्थ वाटत होते असे मी म्हणणार नाही’.
मात्र ग्रीन फलंदाजी करत असताना अजूनही काही चिंतेच्या गोष्टी आहेत, हे मुख्य प्रशिक्षकांनी मान्य केले. त्याने गेल्या काही दिवसांत बरीच सुधारणा केलेली असून त्याने मलाही आश्चर्यचकीत केले आहे. म्हणून ग्रीनला अजूनही धूसर का असेना, पण संधी आहे. सर्व काही ठीक चालले, तर तो कदाचित संघातही असेल, असे मॅकडोनाल्ड यांनी सांगितले. कर्णधार पॅट कमिन्सने याआधी ग्रीनला कसोटीत खेळावे लागले, तरी त्याला गोलंदाजी देण्यास नकार दिला होता. पण मॅकडोनाल्ड यांनी सांगितल्यानुसार, त्याने लक्षणीय प्रगती केली आहे.
ग्रीनचा समावेश झाल्यास 2004 नंतर भारतात प्रथमच बॉर्डर-गावस्कर चषक जिंकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अतिरिक्त फिरकी गोलंदाजाचा समावेश करण्याची संधी मिळेल. मॅकडोनाल्ड पुढे म्हणाले की, त्यांचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पूर्णपणे सज्ज झाला आहे आणि मागील काही दौऱ्यांमध्ये झालेल्या खराब कामगिरीची कसर यावेळी भरून काढण्यास उत्सुक आहे. भारतातील आठ कसोटी सामन्यांमध्ये वॉर्नरला 24.25 च्या सरासरीने धावा जमवता आल्या आहेत.









