वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च नावाच्या शॉर्टसेलिंग कंपनीने गेल्या दहा दिवसांपूर्वी अदानी उद्योग समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांविषयी अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर आता या उद्योग समूहाने सावध भूमिका घेतली असून आपला रोखेविक्रीचा कार्यक्रमही रद्द केला आहे. तीन दिवसांपूर्वी या समूहाने एफपीओ पूर्णतः सबस्क्राईब झालेला असतानाही मागे घेतला होता. या रोखेविक्री कार्यक्रमातून कंपनीने 1 हजार कोटी रुपयांचे भांडवल जमा करण्याची योजना आखली होती. तथापि, हिंडेनबर्ग अहवालानंतर शेअरबाजारात मोठय़ा प्रमाणावर या समूहाचे समभाग घसरल्याने 8 लाख कोटींचे बाजारी भांडवल मूल्य गमवावे लागले होते. त्यामुळे परिस्थिती स्थिरस्थावर होईपर्यंत नवी समभाग विक्री किंवा रोखेविक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









