बसवेश्वर उड्डाणपुलावर कचऱ्याचे ढिगारे : महानगरपालिका, रेल्वे प्रशासनासह कॅन्टोन्मेंट बोर्डकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील रेल्वेफाटकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. याकरिता कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र येथील स्वच्छतेकडे महापालिका, रेल्वे प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने कानाडोळा केला आहे. परिणामी बसवेश्वर उड्डाणपुलावर कचऱ्याचे ढिगारे साचू लागले आहेत. त्यामुळे हीच का स्मार्ट सिटी? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
रेल्वे वाहतुकीत निर्माण होणारी अडचण दूर करण्यासाठी मध्यवर्ती भागातील रेल्वेफाटकांवर उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. आतापर्यंत रेल्वे खात्याने चार ठिकाणी उ•ाणपुलांची उभारणी केली आहे. मात्र उड्डाणपुलांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. परिणामी उड्डाणपुलांवर विविध समस्या निर्माण होत आहेत. काही उड्डाणपुलांच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पथदीप बंद आहेत. तर स्वच्छतेचे काम केले जात नसल्याने कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत.
निम्मे पथदीप बंद
गोगटे चौकाजवळील बसवेश्वर उड्डाणपुलाच्या दक्षिणेकडील भाग महापालिकेकडे येतो. तर उत्तरेकडील भाग
कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. रेल्वे ट्रॅकचा वरील भाग रेल्वे खात्याकडे येतो. त्यामुळे या उड्डाणपुलाची देखभाल कोण करणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. देखभालीकडे किंवा समस्यांबाबत तक्रार केल्यास एकामेकांकडे बोट करून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे येथील निम्मे पथदीप बंद आहेत. महापालिका हद्दीत येणाऱ्या पुलाची स्वच्छता नियमितपणे केली जाते. मात्र कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱ्या पुलावरील स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे या परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत.
तातडीने स्वच्छतेचे काम करण्याची मागणी
ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा आणि गवत उगवले असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच कपिलेश्वर उड्डाणपूल आणि जुना धारवाड रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरील स्वच्छता वेळेवर केली जात नाही. येथील खड्डे बुजविण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील समस्यांची पाहणी करून तातडीने स्वच्छतेचे काम व पथदीपांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.