गुहागर प्रतिनिधी
गुहागर वेलदुर नवानगर मार्गावर नवानगर येथे 65 वर्षीय वृद्धेला एसटीने चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये ती वृद्धा जागीच ठार झाली आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली.
वेलदुर रानवी गुहागर या मार्गावरील एसटी नवानगर मार्गे रानवी येथे येत होती. सकाळी 10:30 दरम्याने ही एसटी नवानगर येथे आली असता, रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या 65 वर्षीय मालती विठू रोहीलकर हिला धडक देऊन तिच्या पाठीवरून एसटीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी एसटीचे चालक चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ होते. तेथील काही ग्रामस्थांनी एसटी चालकाचे लक्ष नव्हते असे म्हटले आहे. मात्र चालकाच्या या दुर्लक्षामुळे एका महिलेचा यामध्ये बळी गेला आहे.ही महिला नवानगर येथे आपल्या सुने बरोबर राहते. मुलगा मुंबई येथे बोटीवर आहे तर मुलगी पालशेत येथे विवाह करून सासरी गेली आहे. या घटनेनंतर गुहागर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, शवविच्छेदनासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र या केंद्रामध्ये पोस्टमार्टम करणारा व्यक्ती नसल्याने व्यक्ती गुहागर येथून बोलवण्यात आला तर गुहागर पोलीस आता या चालकावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.