मुंबई : शेतकरी, युवक, उद्योजक, गरीब, मध्यमवर्गीय, महिला अशा सर्व समाजघटकांना बळ देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. पंतप्रधान मोदींचा ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र पुढे नेणारा आणि भारताला विकसित देश करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
बावनकुळे म्हणाले, मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा अंत्योदयाच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या माणसाची काळजी घेणारा आहे व त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देऊन सक्षम करणारा आहे. मध्यमवर्गीयांच्या आकांक्षाची दखल घेण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि उद्योगांना चालना देत मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी उपाय करणारा हा अर्थसंकल्प आहे. सप्तर्षी संकल्पनेत मांडल्याप्रमाणे समावेशी विकास, पायाभूत सुविधा व गुंतवणूक, युवा शक्तीचा विकास, आर्थिक क्षेत्राचा विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सामान्य माणसाला सोबत घेऊन आगामी पंचवीस वर्षात भारताला विकसित देश बनविण्यासाठी आवश्यक उपाय यात करण्यात आले आहेत.
अधिक वाचा : मुकेश अंबानी बनले भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती
सहकारी साखर कारखान्यांनी 2016 -17 पूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला पैसा हा खर्च समजण्याची अर्थसंकल्पातील तरतूद महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना आयकराच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे. सहकार क्षेत्राला मदत करणाऱ्या या तरतुदीसाठी आपण केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. प्राथमिक कृषी सोसायटय़ांना अधिक सवलती देण्याचा निर्णयही महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे.