प्रतिनिधी /फोंडा
दाग-कपिलेश्वरी येथील उ•ाण पुलाजवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण कठड्याचा काँक्रिटचा मोठा भाग शेजारील घरासमोर कोसळला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. हा कठडा कोसळण्याच्या काही वेळापूर्वीच घरासमोर खेळणारे लहान मूल घरात गेल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
दाग-कपिलेश्वरी येथील बगलरस्त्याला लागून उभारण्यात आलेल्या संरक्षक कठड्याचा हा भाग शशिकांत कवळेकर यांच्या राहत्या घरासमोर कोसळला. या ठिकाणी साधारण 100 मिटर लांबीचा काँक्रिटचा कठडा उभारण्यात आला आहे. त्याचा पाया पक्का नसल्याने बगलरस्त्यावरुन धावणाऱ्या अवजड वाहनाच्या कंपनाचे धक्के त्याला कायम बसतात. त्यामुळेच संरक्षक कठड्याचा काही भाग कोसळला असून उर्वरीत भाग धोकादायक स्थितीत असल्याचे घरमालक कवळेकर यांनी सांगितले. कवळे पंचायतीच्या सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर व स्थानिक पंचसदस्य सुमित्रा नाईक यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच धोकादायक स्थितीत असलेल्या उर्वरीत कठड्याची राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी पाहणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.









