पॉट स्टुडिओ कंपनीतर्फे प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण : ऊ.315 कोटींचा प्रकल्प
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा शहर आता स्मार्ट होणार आहे. त्यासंबंधी ‘मास्टर प्लॅन’ची झलक म्हणजेच सादरीकरण मंगळवारी फोंडा नगरपालिकेत करण्यात आले. पॉट स्टुडिओ या मुंबईतील नामांकीत शहर डिझाईनर आस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी फोंडा शहराचा नियोजित मास्टर प्लॅन पालिका मंडळ व फोंड्यातील काही जाणकार नागरीकांसमोर सादर केला.
अंदाजे रु. 315 कोटी या प्रकल्पावर खर्च होणार असून पहिल्या टप्प्यात फोंड्यातील जुने बसस्थानक, दादा वैद्य चौक, आल्मेदा हायस्कूल परिसर या मध्यवर्ती ठिकाणांचा नियोजनबद्ध विकास तसेच शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याचे बहुउद्देशीय सुशोभिकरण असा वेगळा लूक देणारा प्राथमिक आराखडा बैठकीत सादर करण्यात आला. पुढील दहा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने शहराचा सुनियोजित व बहुउद्देशीय विकास असा हा एकंदरीत मास्टर प्लॅन आहे. फोंड्याची सामाजिक व सांस्कृतिक ओळख जपणारी काही ठळक वैशिष्ट्यो या नियोजित आराखड्यात असतील. फोंडा शहराच्या चारही बाजूंनी डोंगर असल्याने क्षेत्रफळ आटोपशीर आहे. त्यामुळे उपलब्ध सार्वजनिक जागेतच शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याच्यादृष्टीने हा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जुने बसस्थानक, आल्मेदा हायस्कूल परिसर, दादा वैद्य चौक येथील वाहतूक नियोजन व पार्किंग व्यवस्थेवर काम होणार आहे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी फूटब्रीज तसेच झरेश्वरपर्यंत रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य नाल्याचे सुशोभिकरण करतानाच त्याला जोडूनच वॉकिंग ट्रॅक व नागरिकांना मोकळा वेळ घालविण्यासाठी काही जागा विकसित केल्या जातील. शहरातील उद्याने व इतर मोकळ्या जागांच्या नियोजनबद्ध व बहुउद्देशीय विकासाचा त्यात समावेश आहे.
वारखंडे येथून जाणाऱ्या चौपदरी उ•ानपुलाच्या खाली असलेल्या मोकळी जागेत अभिनव संकल्पना असलेल्या काही गोष्टी तयार करण्याचा विचार आहे. फोंडा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून आहे त्या क्षेत्रफळातच पुढील वीस वर्षांचा विचार करुन हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. करमणुकीच्या दृष्टीने राजीव गांधी कलामंदिर जोडूनच काही छोटी सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येतील. शैक्षणीक हब, औद्योगिक क्षेत्र व पर्यटनपुरक असा सर्व दृष्टीकोनांचा विचार करुन हा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे.
नियोजित आराखड्यात काही बदल करण्याच्या सूचना
बैठकीला फोंड्याचे पालकमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना डांगी, मुख्याधिकारी सोहन उसकईकर व इतर नगरसेवक उपस्थित होते. बैठकीला उपस्थित फोंड्यातील वास्तुविशारद तथा जीव्हीएम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर व अन्य काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या नियोजित आराखड्याचे स्वागत करुन त्यात काही बदल सुचविले. शहरात बहुमजली पार्किंग व्यवस्था कुचकामी ठरणार आहे. त्यापेक्षा शास्त्री हॉल इमारतीसारख्या मोकळ्या जागांवर पार्किंग व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली. फोंडा शहरात होणारे गणेशोत्सव व इतर सार्वजनिक उत्सवांसाठी जागा मोकळी सोडण्याची सूचनाही मांडण्यात आली. प्राथमिक स्तरावर हा मास्टर प्लॅन नागरिकांच्या पसंतीस उतरला असून आराखड्यामधील काही त्रुटी दुरुस्त करुन त्यात अपेक्षीत बदल केले जातील. सुधारीत आराखडा जाहीर केल्यानंतर लवकरच कामाला सुऊवात होईल, असे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.









