रमाकांत कोंडुस्कर यांचा आरोप
बेळगाव : हिंदुत्ववादी कार्यकर्ते सामाजिक काम करत असताना त्यांच्यावर विनाकारण तडीपार व रौडी गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांची ही कार्यपद्धती अत्यंत चुकीची असून केवळ राजकीय दबावामुळे खोटे गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल केले जात आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिल्यास हिंदूंचा भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन दिले जाईल, असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी रामनवमी, गणेशोत्सव, शिवजयंती, तिळगूळ समारंभ आयोजित केले जातात. त्यावेळी या ना त्या कारणाने कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे बाहेर काढू, अशी धमकी दिली जाते. तसेच कोणताही धार्मिक कार्यक्रम करताना अधिकाऱ्यांमार्फत अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात एकीकडे गांजा, अफू यांची सर्रास विक्री होत असताना याकडे लक्ष न देता पोलीस मात्र श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या कार्यकर्त्यांवर जाणूनबुजून तडीपारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी आरपीडी कॉर्नर येथे गांजा विक्री करताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करत सोडून दिले. या अशा कारभारामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा खराब होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व युवापिढी भरकटणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.









