तिरंगी टी-20 मालिका : दीप्ती शर्मा सामनावीर
वृत्तसंस्था/ इस्ट लंडन (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 तिरंगी क्रिकेट मालिकेत ‘सामनावीर’ दीप्ती शर्माच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने सोमवारी झालेल्या सामन्यात विंडीजचा 8 गडय़ांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत भारत, यजमान दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांचा समावेश आहे. आता या स्पर्धेत भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवार दि. 2 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
सोमवारच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय गोलंदाजांनी दर्जेदार गोलंदाजी करत नाणेफेकीचा निर्णय सार्थ ठरविला. विंडीजने 20 षटकात 6 बाद 94 धावा जमवत भारताला विजयासाठी 95 धावांचे आव्हान दिले. भारताने 13.5 षटकात 2 बाद 95 धावा जमवत हा सामना आठ गडय़ांनी आरामात जिंकला.
विंडीजच्या डावामध्ये सलामीची फलंदाज आणि कर्णधार हेली मॅथ्यूजने 34 चेंडूत 5 चौकारासह 34 धावा जमवल्या. शबिका गजनबीने 20 चेंडूत 1 चौकारासह 12 तर झायदा जेम्सने 31 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 21 धावा जमवल्या. विंडीजच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आला नाही. विंडीजच्या डावात 2 षटकार आणि 8 चौकार नोंदवले गेले. भारतातर्फे दीप्ती शर्मा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. दीप्तीने आपल्या चार षटकात 11 धावांच्या मोबदल्यात 3 गडी तर पूजा वस्त्रकारने 19 धावात 2 तसेच राजश्री गायकवाडने 9 धावात एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील दुसऱया षटकात सलामीची स्मृती मानधना कॉनेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाली. तिने 5 चेंडूत 1 चौकारासह 5 धावा जमवल्या. जेमिमा रॉड्रीग्ज आणि हरलीन देओल यांनी दुसऱया गडय़ासाठी 33 धावांची भर घातली. आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विंडीजच्या मॅथ्यूजने देओलला झेलबाद केले. तिने 16 चेंडूत 1 चौकारासह 13 धावा जमवल्या. रॉड्रीग्ज आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांनी तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 54 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला 13.5 षटकात विजय मिळवून दिला. रॉड्रीग्जने 39 चेंडूत 5 चौकारासह नाबाद 42 तर कौरने 23 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 32 धावा झळकवल्या. भारताच्या डावात 11 चौकार नोंदवले गेले. विंडीजतर्फे कॉनेल आणि मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज 20 षटकात 6 बाद 94 (मॅथ्यूज 34, विलियम्स 8, कॅम्पबेल 0, जोसेफ 3, गजनबी 12, जेम्स 21, ऍलिने 9, अवांतर 7, दीप्ती शर्मा 3-11, वस्त्रकर 2-19, गायकवाड 1-9), भारत 13.5 षटकात 2 बाद 95 (स्मृती मंधाना 5, रॉड्रीग्ज नाबाद 42, देओल 13, हरमनप्रित कौर नाबाद 32, अवांतर 3, कॉनेल 1-17, मॅथ्यूज 1-7).